प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे: महाराष्ट्रीयन संस्कृतीची मुळे घट्ट धरून जुन्या महाराष्ट्रीयन वेशभूषांना आधुनिक टच देत 'रॉयल तष्ट'ने आज फॅशनच्या दुनियेत आपली अशी एक वेगळी शैली आणि ओळख तयार केली आहे. 'तष्ट' आपली महाराष्ट्रीयन संस्कृती रशियामध्ये सादर करण्यास सज्ज झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'तष्ट' संस्थेला रशियातील 'एक्झिटो' या मीडिया कंपनीने आपली कला सादर करण्यास आमंत्रित केले आहे, अशी माहिती 'रॉयल तष्ट' 'चे क्रिएटिव्ह हेड रवींद्र पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी 'रॉयल तष्ट'चे संचालक दीपक माने, शो कॉर्डिनेटर अभिनंदन देशमुख उपस्थित होते.
या दौऱ्याबद्दल माहिती देताना 'रॉयल तष्ट'चे क्रिएटिव्ह हेड रवींद्र पवार म्हणाले, दिनांक 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान रशियाची राजधानी मॉस्को शहरात होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात 'तष्ट'च्या वतीने काही नवीन कलेक्शन सादर केले जाणार आहे. यामध्ये नऊवारीचे नेक्स्ट व्हर्जन 'दहावारी' आणि पुरूषांसाठी अनारकली पॅटर्नचे ड्रेस असणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जुन्या पेंटिगचे संदर्भ घेवून काही नवीन कलेक्शन तयार केले आहेत, त्यांचे ही सादरीकरण या प्रसंगी करण्यात येणार आहे.
आपल्या या शो विषयी बोलताना पवार म्हणाले, महाराष्ट्रीयन संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचावी हा एकमेव उद्देश अशा प्रकारचे शोच्या करण्यामागे 'तष्ट'चा आहे. यापूर्वी 'तष्ट' ने चारवेळा लंडन येथे आपली कला सादर केली आहे. यंदा रशियाच्या दौऱ्यासाठी गणेशोत्सव ही थीम ठरवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही तेथे शिवाय शाडूच्या मातीपासून श्री गणेश मूर्ती निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर करणार, गणेशोत्सवावर आधारित शो आणि गणपती मिरवणूक काढण्यात येणार आहे. आपली महाराष्ट्रीयन संस्कृती रशियात घेऊन जात असतानाच 'वन लाईफ' हे खास रशियन संस्कृतीवर आधारीत नवीन कलेक्शन सुद्धा असणार आहे. हे संपूर्ण कलेक्शन स्पोर्ट्स आणि अॅ थेलेटीक वेअर मध्ये तयार करण्यात आले आहे. या दौऱ्यात एकूण 22 जणांची टीम जाणार असून यामध्ये मॉडेल, फोटोग्राफर, मेकपमन आदींचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे यातील मॉडेल हे व्यावसायीक मॉडेल नसून विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती असणार आहेत.
फॅशन आणि वारसा यांची उत्तम जाण असलेला, अन् संस्कृतीचा हात धरून फॅशन जगात एक ब्रँड म्हणून पुढे आलेले 'तष्ट' हे फॅशन जगतातील एक मोठं नाव. फॅशन आणि ऐतिहासिक संस्कृतीमध्ये समतोल राखत पुण्यातील 'तष्ट' पुढे वाटचाल करीत असून मॉस्को मध्ये होत असलेल्या या खास शो साठी आम्ही रशियातील सर्व भारतीयांना निमंत्रित करत आहोत असेही पवार यांनी नमूद केले.