प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पुणे दि:-31 ऑगस्ट 2021 महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या वतीने रोजगाराचा अधिकार आणि कामगारांच्या नोंदणीकरिता आज 31 ऑगस्ट रोजी पुणे येथे कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य आंदोलन केले गेले. पुण्यातील अप्पर डेपो, कात्रज, दत्तनगर, गोकुळनगर, कोंढवा येथील मजूर अड्ड्यावरील शेकडो मराठी व हिंदी भाषिक बांधकाम कामगार यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. "कामगार एकजुटीचा विजय असो", "मजदूर एकता जिंदाबाद', "भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा झालाच पाहिजे", "हर हाथ को काम दो, वरना गद्दी छोड दो", "प्रत्येकाची नोंदणी झालीच पाहिजे", "बेरोजगारी भत्ता मिळालाच पाहिजे", "इंकलाब जिंदाबाद", "कामगारांना पेंशन मिळालीच पाहिजे" या घोषणांनी शिवाजीनगरचा परिसर दणाणून गेला होता.या वेळी घरकामगार संघर्ष समिती सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते , तसेच नौजवान भारत सभेतर्फे पाठिंबा देण्यात आला.
सर्व कामगार प्रतिनिधींनी आपला रोष व्यक्त करत मांडले की करोना काळानंतर रोजगाराची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे, कामगार उपाशी आहेत आणि राज्य-केंद्र सरकार त्या कडे दुर्लक्ष करत आहेत. कामगारांच्या नोंदण्या जाणीवपूर्वक रखडवण्यात येत आहेत जेणेकरून सरकारला जबाबदारीमुक्त रहाता यावे. मोदी आणि ठाकरे ही दोन्ही सरकारे फक्त बिल्डर-भांडवलदारांच्या सेवत गुंतली आहेत, आणि बांधकाम कामगार व घरकामगारांना वाऱ्यावर सोडले आहे.
या वेळी प्रतिनिधी मंडळाला कामगार आयुक्तांनी रखडलेल्या नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच अपघाताने मृत्यू झालेल्या युनियन सदस्य सोपान क्षिरसागर यांना नुकसान भरपाई सुद्धा मंजूर केली. रोजगार अधिकारा संदर्भातील निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे, तेव्हा त्याबद्दल मंत्रीमंडळाकडे त्यासंदर्भातील पत्र पाठवल्याची प्रतही उपलब्ध करून दिली.
कामगारांमध्ये जात-धर्म-भाषेच्या नावाने फूट पाडणाऱ्या नेत्यांपासून आणि संघटनांपासून सावध राहण्याचा इशारा देत परमेश्वर जाधव यांनी मांडले की एकता हीच कामगारांची खरी शक्ती आहे आणि जात-धर्म-भाषेच्या भेदभाव विरुद्ध लढूनच कामगार खऱ्या अर्थाने एक होऊ शकतात. आंदोलनाचा समारोप करत त्यांनी मांडले की महाराष्ट्रामध्ये रोजगार अधिकाराच्या आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे, आणि राज्य भरामध्ये या मागणीच्या भोवती व्यापक एकजूट बनवण्याकरिता यापुढे युनियन प्रयत्नशील राहील आणि येत्या काळात हजारोंच्या संख्येने मुंबईला मोर्चा नेऊन झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.