प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाममध्ये दवाखाने, रोगनिदान केंद्र, मेडीकलसह आठ ते दहा ठिकाणी घरफोडी करत धुमाकूळ घालणाऱ्या दोन सराईतांना मार्केटयार्ड पोलिसांनी अवघ्या 48 तासात अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तौसिफ बशीर शेख (वय 24, शिवनेरीनगर, कोंढवा), अमोल किसन अवचरे (वय 24, रा.कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ.संजय फत्तेचंद ओसवाल (वय 48, रा.बिबवेवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे.
गंगाधाम चौकात डॉ. संजय ओसवाल यांचे क्लिनीक आहे. 29 जुलैला पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या क्लिनीकचा दरवाजा तोडून रोख रक्कमेसह मुद्देमाल चोरुन नेला होता.त्याशिवाय चोरट्यांनी हबीब हेअर अॅन्ड ब्युटी पार्लर, पी.ए.डायग्नोस्टिक सेंटर, देव अंकल किचन, पाशर्व डेंटल क्लिनीक, डॉ.कटारीया क्लिनीक, लाईफ फार्मा क्लिनीक व प्रकाश गॉगल अशा आठ ते 10 दुकानांचे शटर उचकटून 3 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता.
आरोपी कात्रज येथील पेट्रोल पंपाजवळ येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई स्वप्नील कदम आणि सुनील पोळेकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सराईत शेखविरुद्ध 24 तर अवचरेविरुद्ध 14 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सविता ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस कर्मचारी अशोक हिरवाळे, स्वप्नील कदम, सुनील पोळेकर, विशाल वारुळे, अनिरुद्ध गायकवाड, भिमा कांबळे, वैभव मोरे, अनीस शेख, संदिप घुले यांनी केली.