रवींद्र बऱ्हाटे याला आश्रय देणाऱ्या अॅड. सागर म्हस्के याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

जमिन लाटण्यासह फसवणूकप्रकरणी मोक्का गुन्ह्यात फरार असताना माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला आश्रय देणाऱ्या अॅड. सागर म्हस्के (वय - 34, रा. आळंदी रस्ता) याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.तब्बल 17 गुन्ह्यात मागील एक वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या बऱ्हाटेला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुटेकचा निःश्वास टाकला होता. त्यानंतर त्याला आश्रय देणाऱ्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत होता. त्यानुसार विविध पथकांकडून दिवसरात्र काम करण्यात आले. त्यानंतर काल रात्री म्हस्के याला अटक करण्यात आली आहे.

शहरातील अनेक नागरिकांची फसवणूक करून त्यांची जमिन बळकाकविणे, धमकी देऊन प्रॉपर्टी स्वतःसह टोळीच्या नावावर करून घेणे, धमक्यांना भीक न घालणाऱ्याना थेट गोळ्या घालण्याचा इशारा देणे, बदनामी करणे यासह संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी रविंद्र बऱ्हाटे याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला आश्रय देणारे, सोशल मीडिया हँडल करणारे लोक, छुप्या पद्धतीने फोनवर संपर्क साधणारे, त्याशिवाय बऱ्हाटेने फेसबुकवर अपलोड केलेले व्हिडीओ वारंवार पाहून लाईक करणाऱ्यांची कुंडली तपासण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकांकडून संबंधितांच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष ठेवण्यात आले होते. त्यानुसार काल रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने म्हस्के याला अटक केली आहे.

खंडणी, फसवणूक आणि जमिन बळकाविण्याच्या विविध गुन्हयांमध्ये बऱ्हाटे एक वर्षांपासून फरार होता. त्यापैकी तीन गुन्ह्यामध्ये त्याच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात तो पुण्याजवळील आळंदी देवाची परिसरात असलेल्या दिघीत राहत असल्याचे आता उघडकीस आले आहे. त्याला आश्रय देणाऱ्या म्हस्के याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post