प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : राज्यात सर्वत्र पाऊस थांबला आहे. त्यामुळे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातही पावसाने पाठ फिरवल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे.पुढच्या दोन दिवसांत पुण्यात आकाश अंशतः ढगाळ असून दुपारनंतर काहीशा हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आज कमाल तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसपर्यंत
पुणे शहरात गेल्या आठवड्यात हवेतली आर्द्रता 90 टक्क्यांच्या दरम्यान होती. पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत होत्या. त्यामुळे हवेच गारठा जाणवत होता. मात्र, आता आर्द्रतेचे प्रमाण 77 टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. कमाल तामानापाची पाराही सरासरीपेक्षा जास्त नोंदवला जात आहे. आज कमाल तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे.
पावसाचा पाठशिवणीचा खेळ!
जून महिन्याच्या सुरूवातीला पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर पुण्यात पावसाने सतत हुलकावणी दिली आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस बरसल्याने मॉन्सूनने जून महिन्याची सरासरी ओलांडली होती. त्यानंतर अर्धा जुलै महिना ओलांडला तरी शहरात पावसाचा पत्ता नव्हता.
त्यानंतर पुन्हा जुलैच्या महिन्याच्या अखेरीस शहरात 193 मिमी पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. 25 ऑगस्टपर्यंत पुण्यात 38.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा तब्बल 70 मिमीपेक्षा कमी आहे. गेल्या 10 वर्षांत ऑगस्ट महिन्यात पुण्यात पडलेल्या पावसाची तुलना केली तर यंदा सर्वात कमी पाऊस पडलेलं हे दुसरं वर्ष आहे.
शहरात तापमानात वाढ
मॉन्सून गायब झाल्यानंतर मागच्या तीन ते चार दिवसांपासून पुण्यातलं तापमान वाढलं आहे. किमान आणि कमाल तापमानात सरासरी दोन ते चार अंशांनी वाढ झाली आहे. दिवसा प्रखर ऊन तर रात्रीही उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीट ऑगस्टमध्येच जाणवत असल्याचं चित्र आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत ऑगस्ट महिन्यात सरासरी तापमान हे 25 ते 30 अंशांवर स्थिर असतं. पण आता मॉन्सूनची थांबल्याने तापमानात वाढ झाल्याचं दिसतंय. राज्यात सध्या सरासरी तापमान हे 31 अंशांवर गेलं आहे.