प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पर्यावरण संवर्धन ही चळवळ व्हावी :पोलीस उपायुक्त मितेश घट्टे ..
पुणे : तेर पॉलिसी सेंटरच्या राष्ट्रीय पातळीवरील 'ग्रीन ऑलिम्पियाड ' चे उदघाटन सोमवारी दुपारी पुण्याचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन झाले .
वृक्षारोपण,पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या अभिनव उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. मागील वर्षी देशभरातून २ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. www.terregreenolympiad.com या संकेतस्थळावर आजपासून १६ सप्टेंबरपर्यंत विनामूल्य नोंदणी करता येणार आहे.वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्यासाठी ३ गटात ही ऑलिम्पियाड स्पर्धा होणार आहे. त्यात ५ ते ९ वृक्षांची रोपे लावणाऱ्यांचा गट,१० ते १२ वृक्षांची रोपे लावणाऱ्यांचा गट,आणि बारापेक्षा अधिक वृक्षांची रोपे लावणाऱ्यांचा गट असणार आहे.प्रत्येक गटातील पहिल्या ५०० विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी निवडले जाणार आहे.प्रत्येक गटात पहिल्या पाच क्रमांकाचे विद्यार्थ्यांना लॅपटॉप ,मोबाईल फोन ,टॅब अशी पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.सर्व गटात मिळून पहिल्या १०० विद्यार्थ्यांना हार्ड डिस्क ड्राइव्ह आणि इतर पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या शाळांनाही गौरविण्यात येणार आहे
राधा फडणीस यांनी सूत्रसंचालन केले.कृष्णा पाटील यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेची माहिती दिली.
डॉ विनिता आपटे म्हणाल्या ,'पर्यावरणाबाबत जनजागृती करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शालेय वयापासून पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण व्हावे,यासाठी हा उपक्रम आयोजित केला जात आहे ,दरवर्षी या उपक्रमाला प्रतिसाद वाढत आहे'.भीमथडी शिक्षण संस्थेचे शिक्षक प्रमोद काकडे म्हणाले,'विद्यार्थ्यांना आधुनिक विचार देताना ,विद्यार्थी पर्यावरणाबाबत संवेदशील होण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होतो .
पोलीस उपायुक्त मितेश घट्टे म्हणाले ,'पर्यावरण जपण्याचा विचार केवळ एक दिवस करून चालणार नाही.पर्यावरणाचे महत्व सर्वांना पटवून देता आले पाहिजे.निसर्ग मोठा की चंगळवाद मोठा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रचंड पावसात जनजीवन वाहताना आपण यावर्षी पाहिले आहे.पूर्वी लहानपण हे निसर्गासोबत जायचे,आता ते तंत्रज्ञानाबरोबर जाते आहे .निसर्गाची शिकवण आपल्यापासून दूर गेली आहे. मानवाची हाव वाढत असून निसर्गाला ओरबाडण्याची वृत्ती वाढत आहे.पुढील पिढयांना झाडे ,टेकड्या ,डोंगर चित्रातून दाखवायची वेळ येईल का,याची भीती वाटते .खऱ्या निसर्गजीवनाला आपण मुकणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे.पर्यावरणप्रेमाचे बाळकडू तेर पॉलिसी सेंटरकडून दिले जात आहेत,ही मोठी गोष्ट आहे.पर्यावरण संवर्धन ही चळवळ झाली पाहिजे'.