पुण्यातील वादग्रस्त पोलीस निरीक्षकावर आणखी एक अदखलपात्र गुन्हा दाखल



     प्रेस मीडिया वृत्तसेवा:

    पुणे : घराचे काम करणाऱ्या इंटेरियर डेकोरेटरला मारहाण करून डोक्याला पिस्तुल लावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या वादग्रस्त पोलीस निरीक्षकावर आणखी एक अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. एका तरुणाला व त्याच्या वडिलांना मारहाण करत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. दरम्यान कायम वादग्रस्त असलेल्या पोलीस निरीक्षकांवर मात्र वरिष्ठ अधिकारी मेहरबान असून, त्यांच्यावर ठोस कोणतीच कारवाई होत नसल्याने उलटसुलट चर्चा आहेत.याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. समर्थ पोलीस ठाण्यात भादवी कलम ३२३, ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे (अदखलपात्र) दाखल केला आहे. 

    याबाबत विश्वास नामदेव जाधव (वय ४८) यांनी तक्रार दिली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक हे समर्थ वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी आहेत. तर फिर्यादी नाना पेठेत राहण्यास आहेत. त्यांचा मुलगा तन्मय सोमवारी सकाळी साडे आकराच्या सुमारास घरघुती सामान आणण्यास मोपेड दुचाकीवर आला होता. अ‍ॅक्टिव्हा दुचाकी त्याने पार्क केल्यानंतर वाहतुक पोलिसांनी ती उचलून नेली. त्यामुळे फिर्यादी व त्यांचा मुलगा समर्थ वाहतूक विभागात गेले होते. त्यांनी पोलीस निरीक्षक पुराणिक यांना विनाकारण गाडी उचलून आणली आहे. तसेच आपण मदत करण्याची विनंती केली. त्यावेळी गाडी उचलून आणणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्याने तन्मयने शिवी दिल्याची खोटी माहिती पुराणिक यांना दिली. पुराणिक यांनी तन्मय व फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी करत मारहाण केली. तसेच मुलाच्या मोबाईलच्या स्क्रिनचे नुकसान करुन खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असे या तक्रारीत म्हंटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर तक्रारदार यांनी समर्थ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे किरकोळ गुन्हे दाखल होताच पटापट गंभीर कलम पावत गुन्हे दाखल करणाऱ्या पुणे पोलीस मात्र पोलीस निरीक्षकावर अदखलपात्र गुन्हे दाखल करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळेच या पोलीस निरीक्षकाचे धाडस वाढले असल्याचे खासगीत पोलीस बोलत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post