प्रेस मीडिया वृत्तसेवा -
पुणे:- प्रेस मीडिया वृत्तसेवा ,महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या वतीने डॉ. तुषार निकाळजे यांच्या "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी " या बहु भाषीय पुस्तकाचे प्रकाशन आज दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले. सध्याच्या सामाजिक अंतराबाबतचे भान राखून हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला.
या बहुभाषीय पुस्तकातील इंग्रजी भाषेतील लिखाण डॉ.तुषार निकाळजे यांनी केले आहे .त्याचे हिंदी व उर्दू भाषांतर श्री. मोहम्मद शुक्रुल्लाह यांनी केले आहे .या ऑनलाईन कार्यक्रमाचे संयोजन कु. हर्षदा टिल्लू यांनी केले .याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. हाफिज शोएब अन्सारी, कार्यप्रमुख ,फिदा- ए- मिलाद इंग्लिश स्कूल, कोंढवा ,पुणे उपस्थित होते. श्री .अन्सारी म्हणाले ,"या बहुभाषीय पुस्तकाचा उपयोग सर्वभाषिक विद्यार्थ्यांना होईल. या पुस्तकाचा विषय सामाजिक बांधिलकीमधून व्यक्त केला आहे अशा प्रकारचे विषय प्रकाशित केले जावेत अशी मी इच्छा व्यक्त करतो ."अध्यक्षस्थानी एका विद्यार्थिनीचे पालक श्री .जयंत कुलकर्णी उपस्थित होते. श्री.जयंत कुलकर्णी म्हणाले ,"या पुस्तकाचा उपयोग फक्त विद्यार्थ्यांना नाही ,तर पालकांना देखील होईल .विद्यापीठांचे वेळोवेळी बदलणारे नियम व कार्यपद्धती यांची पालकांना माहिती होईल. त्यामुळे पालकांमध्ये निश्चितता राहण्यास मदत होईल .पाल्यांसोबत होणारी धावपळ व ताण कमी होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण देखील कमी होईल".
या पुस्तकाचे प्रकाशक व प्रेस मीडिया वृत्तसेवा यांचे संपादक श्री. मेहबूब गुलाब सर्जेखान म्हणाले ,"या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांची सेवा करण्याची मला एक संधी मिळाली. विद्यार्थी ही आपली भावी पिढी असतात त्यांना या पुस्तकाच्या आधारे ज्ञान व प्रगतीचे साधन तयार करण्याचा हा योग आला. तसेच विविध भाषांमध्ये साहित्य निर्मिती होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे एकच विषय सर्वभाषिकांना समजण्यास मदत होईल .या पुस्तकातील हिंदी व उर्दू भाषांतर करणारे श्री. मोहम्मद शुक्रुल्लाह म्हणाले, "विद्यार्थ्यांचे उपयुक्त विषयाचे भाषांतर करण्याचे भाग्य मला आज लाभले .आयुष्यात मी वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केले आहे. परंतु अशा प्रकारच्या विषयावर लिखाण करण्याची पहिली वेळ आहे .ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ .तुषार निकाळजे यांनी विद्यार्थी व पालक यांच्या संवेदनशील विषयावर माहिती देणारे हे पुस्तक माझ्या आयुष्यातील मोठा ठेवा आहे .हे पुस्तक शासकीय कर्मचारी व अधिकारी तसेच शिक्षकांना देखील उपयुक्त ठरणाऱ आहे .
या पुस्तकाचे लेखक डॉ .तुषार निकाळजे म्हणाले ,"मी आजपर्यंत या विषयाचे मराठी, ब्रेल -इंग्रजी ,हिंदी ,उर्दू, इंग्रजी भाषेत पुस्तक विद्यार्थ्यांना सादर केले आहे .हे पुस्तक भारतीय व परदेशी भाषेत प्रकाशित करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच वेगवेगळ्या ब्रेल भाषेतील लिपीमध्ये हे पुस्तक दृष्टिहीन विद्यार्थ्यांकरता देखील उपलब्ध करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे." याप्रसंगी विद्यार्थिनी कु. केतकी जयंत कुलकर्णी यांनी विद्यार्थी उपयुक्त पुस्तक निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले .कु. रविताल आगरवारकर या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.