प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे – पुण्यात एका जावयाने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. खुद्द जावयाने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईडनोटमध्ये सासरच्यांना जबादार धरलं आहे. निखिल धोत्रे असं मृत जावयाचं नाव आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वीच निखिल आणि त्याची पत्नी सोनाली धोत्रे यांचं भांडण झालं होतं. गरोदर असलेल्या सोनालीच्या बाळातपणासाठी कोणत्या दवाखान्यात नोंदणी करायची यावरून निखिल-सोनाली यांच्यात वाद झाला होता. या भांडणावेळी दीर विकास धोत्रे आणि लक्ष्मी धोत्रे यांनी सोनालीला हार्पिक क्लिनर पाजले. या घटनेनंतर निखिलच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सोनालीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान रविवारी दुपारी निखिल बराच वेळ रुमच्या बाहेर आला नाही. रुम आतून बंद होती. रुमचा दरवाजा तोडल्यानंतर कळलं की, निखिलने ओढणीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृत्यूपूर्वी निखिलने सुसाईडनोट लिहिली. त्यात तो म्हणाला की, सासरच्या लोकांनी आपल्याला खूप त्रास दिला आहे. त्यांच्यामुळे आपण कर्जबाजारी झालो असून माझ्या मृत्यूला तेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे त्यात म्हटले आहे. तसेच ‘आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे’, असंही लिहिलं आहे.