कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात शिव सैनिकांनी राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, प्रतिमेला 'जोडे मारो', 'चक्का जाम' आंदोलने केली



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि नगर जिह्यांत शिवसैनिकांनी राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, प्रतिमेला 'जोडे मारो', 'चक्का जाम' आंदोलने केली.दरम्यान, शिवसैनिकांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात राणें विरोधात गुन्हा दाखल झाला असून, अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले.

राणें विरोधात नगरमध्ये गुन्हा

शिवसेना पदाधिकाऱयांनी दिलेल्या तक्रारीनुसार नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी फिर्याद दिली. शहरासह जिह्यात ठिकठिकाणी राणेंविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संतप्त शिवसैनिकांनी नगरच्या भाजप कार्यालया समोर घोषणाबाजी करीत राणे यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन करून प्रतिमेचे दहन केले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी विक्रम राठोड, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशा निंबाळकर, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. नगर शहरासह पाथर्डी, कोपरगाव, शिर्डी, राहुरी, देवळाली प्रवरा, कर्जत येथे आंदोलन करण्यात आले.

किणी टोलनाक्यावर चक्का जाम

हातकणंगले तालुक्यात शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर चक्का जाम करण्यात आले.

सांगलीत राणेंच्या प्रतिमेला काळे फासले

नारायण राणे यांच्या बेताल वक्तव्याचे सांगली जिह्यात तीव्र पडसाद उमटले. पुतळादहन, पुतळ्याला 'जोडे मारो' आंदोलन करून, प्रतिमेला काळे फासून शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. शिवसेना उपनेते, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिह्यात आंदोलन करण्यात आले. भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर राणे यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले.

सोलापुरात राणेंच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड

संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून जोडेमार आंदोलन केले. करमाळ्यात राणेंच्या प्रतिमेची गाढवावरून मोर्चा काढला. राणेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी युवासेनेने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन दिले. काही ठिकाणी शौचालयावर राणेंचा फोटो लावून निषेध व्यक्त करण्यात आला. शहरात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी संभाजी महाराज चौकात आंदोलन केले. करमाळ्यात शिवसैनिकांनी सुभाष चौकातून राणेच्या प्रतिमेचे गाढवावरून मिरवणूक काढत आंदोलन केले. दरम्यान, कन्ना चौक येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. भाषणबाजी सुरू असताना पोलीस घटनास्थळी येताच कार्यकर्त्यांची पांगापांग झाली.

साताऱयात तीव्र निदर्शने, मोर्चा

नारायण राणेंविरोधात सातारा जिह्यात तीव्र निदर्शने करण्यात आली. सातारा, कराड, फलटण, महाबळेश्वरसह जिल्हाभर रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी मोर्चे काढले. जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांच्या नेतृत्वाखाली शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. कराडमध्ये शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले.

कोल्हापुरात महामार्ग रोखला

नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन, रास्ता रोको, महामार्ग रोको आंदोलनासह गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहरात आांदोलन करण्यात आले. जिल्हा युवासेनेने पुणे-बंगळुरू महामार्गावर तावडे हॉटेल परिसरात रास्ता रोको करण्यात आला. युवासेना जिल्हाधिकारी मंजित माने, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर शहरप्रमाणेच जयसिंगपूर, हुपरी, गडहिंग्लज, इचलकरंजी, भुदरगड येथे आंदोलन करण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post