प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अठक केली आहे. राणे यांना अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं.त्यानंतर आता त्यांना महाड पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी महाडमधील पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर आता राणेंना महाड पोलीस ठाण्याकडे नेण्यात आलं आहे. दरम्यान, महाडमध्ये पोहोचण्यासाठी तीन तासाचा अवधी लागू शकतो. त्यामुळे राणेंना आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता नाही. अशा वेळी राणे यांना आता आजचा मुक्काम महाड पोलीस ठाण्यात होईल, असं सांगितलं जात आहे.
उद्या रायगड पोलीस ठाण्यात हजर केलं जाणार?
तत्पूर्वी राणे यांनी रत्नागिरी सत्र न्यायालय अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर राणे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, राणेंच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलाय. त्यामुळे राणे यांना तिथेही दिलासा मिळाला नाही. अशावेळी राणे यांना आता महाड पोलीस ठाण्यात हजर केलं जाणार आहे. त्यासाठी महाड पोलीस राणेंना संगमेश्वर पोलिसांकडून ताब्यात घेत महाडकडे रवाना झाले आहेत. त्यानंतर उद्या राणे यांना रायगड सत्र न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
रुग्णालयात दाखल केलं जाणार?
दुसरीकडे राणे यांचा रक्तदाब वाढल्याचं वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, राणे यांनी शुगर आणि ईसीजी करता आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. तर राणे यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे नारायण राणे यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात येणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
राणेंचे वकिल काय म्हणाले?
करण्यात आलेली संपूर्ण कारवाई चुकीची आहे. कारण जे कलम राणेंवर लावण्यात आले आहेत, त्यात 7 वर्षांपेक्षा कमीची शिक्षा आहे. अशा प्रकरणात अटकेची थेट कारवाई करता येत नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडे देखील आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीचं पालन न करता थेट अटकेची कारवाई ही बेकायदेशीर आहे. आम्ही योग्य त्या कोर्टाच निश्चित न्याय मागू. हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे याबाबत मला जास्त बोलता येणार नाही. परंतु, तुर्तास एवढंच सांगतो ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आणि कायद्याला धरुन नसल्यामुळे आम्ही योग्य त्या न्यायालयात जाऊन याचिका दाखल करु, असं राणे यांचे वकिल अनिकेत निकम यांनी म्हटलंय.