.ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल ...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे.ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा 76 वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमआरडीए मैदान, वांद्रे कुर्ला संकुल येथे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या वाहनांची पाहणीही केली.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना महामारीमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले त्याप्रमाणे रस्त्यांवरील वेगवान धावणाऱ्या वाहनांच्या अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या हजारात आहे. भरधाव वेगाने वाहने चालवू नयेत असे आवाहन करूनही नियमांचे पालन न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. याला आळा घालण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज वाहने दाखल झाली असून या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल स्थानी असल्याचा अभिमान आहे, अशी भावना ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

परिवहन विभागाने अद्ययावत यंत्रणा कार्यरत केल्याचे समाधान व्यक्त करून या यंत्रणेच्या वापरातून अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि जीवितहानी रोखणे हा राज्य शासनाचा हेतू निश्चितच साध्य होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

कारण नसताना उगाचच वेगापायी वाहनचालक आणि प्रवाशांचेही प्राण जातात. अनेकदा वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. ही प्राणहानी न होता त्यांना वाचवणे हेच शासनाचे कर्तव्य आहे. कोरोना महामारी किंवा अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच सहकार्य करेल असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले, देशातील रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाचे मार्गदर्शक तत्वे ठरवून दिलेले आहेत. गेल्या वर्षभरात दुर्दैवाने महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण वाढले होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी वायुवेग पथकांना अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असलेली 76 वाहने उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या वाहनांच्या माध्यमातून अपघातांचे प्रमाण आणि बेशिस्त वाहतूक नियंत्रणात येईल. भविष्यात महाराष्ट्र अपघात रोखण्यात यश मिळेल. तसेच अपघाताच्या प्रमाणाबाबतीत राज्याचे स्थान खाली आणण्या साठीही वाहनांचा उपयोग होईल, असेही परब यांनी यावेळी सांगितले. वायुवेग पथकाच्या माध्यमातून वेगवान आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करता येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post