प्रेस मीडिया वृत्तसेवा -
देशाच्या स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिना निमित्त मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. कोविड नियमांचे पालन करीत साधेपणाने हा सोहळा साजरा झाला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार झिशान सिद्दीकी, दिलीप लांडे, नगरसेवक प्रो.विश्वनाथ महाडेश्वर, रोहिणी कांबळे, प्रज्ञा भूतकर, शेखर वायंगणकर, माजी आमदार विद्या चव्हाण, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे, अभिषेक त्रिमुखे आदी उपस्थित होते.
मागील वर्षभर कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे बिकट परिस्थिती असतानाही उत्कृष्ट काम केल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करून आभार मानले
.या काळात नागरिकांनी देखील शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना कोविड नियमावलीचे पालन करून सहकार्य केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. पोलीस शौर्य पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे तसेच पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल खेरवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय निकुंबे यांचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महसूल दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हास्तरावर गौरवास पात्र असलेल्या अपर जिल्हाधिकारी निलिमा धायगुडे, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, विकास गजरे, तहसिलदार स्मिता मोहिते, आयुब तांबोळी, वंदना मकु यांच्यासह विविध पदांवरील 23 अधिकारी कर्मचाऱ्यांचाही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. 2020-21 या वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कार अंतर्गत जिल्ह्यातील प्रवीण गायकवाड (युवक), मनीषा वैद्य (युवती) आणि एकता मंच, वर्सोवा (संस्था) यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.