प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई : केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरू राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत हे विसरू नका. कोविडचा धोका टळलेला नाही. त्यामुळे कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविड दूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही याची खबरदारी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.मात्र तिसऱ्या लाटेत रुग्ण वाढले आणि ऑक्सिजन साठा कमी पडला तर राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
कालिना- सांताक्रूझ परिसरातील बाल कोविड केअर सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या वेळी आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठय़ात विशेष काही वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठय़ापर्यंत पोहोचलो तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे टाळा असे आवाहनही केले.
चिथावणीला बळी पडू नका
अर्थचक्र सुरू राहण्यासाठी आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वतःच्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.
संसर्ग व मृत्युदर कमी करायचाय
पहिल्या लाटेच्या अखेरीस सण-उत्सव आले होते, पण आता दुसरी लाट ओसरता ओसरता सण-उत्सवांची सुरुवात होत आहे. त्यात आपण गेल्या पंधरा दिवसांपासून निर्बंध शिथिल केले आहेत, पण ही मोकळीक आपले दैनंदिन पोटापाण्याचे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आहे. आपल्याला संसर्ग आणि मृत्युदर आणखी कमी करायचा आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र पहिले राज्य
तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असल्याने सरकारने लहान मुलांसाठी कोविड टास्क फोर्स स्थापन केला असून असा टास्क फोर्स स्थापन करणारे आपले पहिले राज्य आहे. मुंबईत आधुनिक अशी जिनोम सिक्वेंन्सिंग प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून त्या माध्यमातून आपल्याला संसर्गाविषयी शास्त्र्ााrयदृष्टय़ा व्यवस्थित आणि त्वरेने माहिती मिळत राहील असेही ते म्हणाले.