प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मलकापूर ता. १६ आज राजकारणातून साधन सुचिता हरवल्याने राजकारण हे निवडणूक केंद्रित झाले आहे. त्यामुळे निवडणूक मतदार केंदित राहिलेली नाही. परिणामी विकासाच्या प्रक्रियेतून सामान्य माणूस वजा झाला आहे.गरीबी हटावच्या प्रयत्नांची खिल्ली उडवणाऱ्यांनी आज गरीबाला जगण्याचा अधिकारच नाकारणारी धोरणे राबविणे सुरू केले आहे. त्यातून सर्वांगीण उद्धवस्तीकरणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.याचा घटनानिष्ठ राष्ट्रीय विचार करून ती धोरणे बदलण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. अंतिम सत्ता लोकांची व जनतेचेच सार्वभौमत्व सर्वश्रेष्ठ आहे. हाच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सर्वसामान्य जनतेने आम जनतेला दिलेला आदेश आहे ,असे मत समाजवादी प्रबोधिनी सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या 'प्रा. डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालय,( मलकापूर पेरिड )च्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन वेबिनारमध्ये " भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे " या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुनील हेळकर होते. सांस्कृतिक विभागप्रमुख व समन्वय क प्रा.बी.एस.चिखलीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. एन.के.कांबळे यांनी करून दिला.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले,भारतीय स्वातंत्र्य चळवळीने आणि स्वातंत्र्यानंतर आकाराला आलेल्या संविधानाने एक समतावादी मूल्यव्यवस्था निर्माण केली होती. त्या व्यवस्थेच्या आधारे देशाची उभारणी करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या उभारणीलाआज केवळ खीळ नव्हे तर ती उद्धवस्त करून भांडवलशाहीच्या घशात उतरवण्याचे कारस्थान आकाराला येत आहे. मूल्ये सोडली की अवमूल्यन अपरिहार्य होते हा इतिहास आहे. विकृत भांडवलशाहीने आज राजकारणावर आपला धाक निर्माण केला आहे. आहे रे आणि नाही रे वर्गातील दरी वाढत आहे. रोजगार नष्ट होऊन बेरोजगारी प्रचंड वाढत आहे. महागाईने जगणे कठीण बनले आहे. समन्वयापेक्षा संघर्ष वाढतो आहे .सामाजिक न्याय नाकारला जात आहे. कोरोनाच्या विषाणूने लाखो बळी जात आहेतच.पण त्याच बरोबर जगतांना जीव गुदमरला जाणाऱ्या कोरोनी राजकीय,आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक धोरणांनी करोडो लोक मरत मृत्यूच्या खाईत लोटले जात आहेत याचा विचार तातडीने करण्याची गरज आहे.
प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये स्वातंत्र्य आंदोलन ,भारतीय राज्यघटना, गेल्या सात-साडेसात दशकातील भारताची उभारणी आणि आज निर्माण झालेली आव्हाने याचा सविस्तर उहापोह आपल्या मांडणीतून प्रभावीपणे केला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.सुनील हेळकर म्हणाले, ब्रिटिश सत्तेने आपले आर्थिक शोषण केले. पण त्याचबरोबर माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या इथल्या चुकीच्या रूढी परंपरा , बुरसटलेली विकृत विचारधारा, ग्रंथप्रामाण्यवादी जाती उतरंडीची व्यवस्था यांनाही उघडे केले.परिणामी स्वातंत्र्य आंदोलनही व्यापक झाले. स्वातंत्र्याची पहाट उजाडल्यानंतर देशाच्या विकासाचा निश्चितच स्तुत्य प्रयत्न झाला. मात्र अलीकडे बदलती राजकीय आर्थिक धोरणे नैसर्गिक व अन्य आपत्ती यामुळे सर्वांगीण अरिष्ट वाढत आहे.त्यातून योग्य धोरणे आखून मार्ग काढण्याची गरज आहे.
या व्याख्यानाला प्राध्यापक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.आभार प्रा.एस.के.खोत यांनी मानले.