प्रेस मीडिया वृत्तसेवा :
महाराष्ट्राला खळखळुन हसवणारे 'विनोदवीर' म्हणजेच दादा कोंडके. आजही दादांच्या चित्रपटांची जादू ओसरलेली नाही. दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मराठीतला सुपरस्टार अभिनेता भरत जाधव याने सोशल मीडियावरून दादांना अनोख्या शैलीत अभिवादन केले आहे.
दादा कोंडके यांच्या गाजलेल्या 'पांडू हवालदार' या चित्रपटातील लूकशी साधर्म्य साधणारा आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत भरतने म्हटलेय, ''आज दादांचा वाढदिवस आहे. अनेक लोकांना वाटते की, गंभीर भूमिका करणारा ग्रेट अॅक्टर असतो. उलट तशा प्रकारच्या भूमिकांपेक्षा कॉमेडी करणे दहापट अधिक कठीण आहे. गंभीर भूमिका करताना बॅकग्राऊंड म्युझिक किंवा विषयाचा अभ्यास करून अभिनय करता येतो.मात्र कॉमेडी करताना या सर्व गोष्टी नसतात.''
पुढे त्याने लिहिलंय, ''आज इतक्या वर्षांनंतरही आपण दादांचे चित्रपट एन्जॉय करतो ते केवळ डबल मिनिंग डायलॉग किंवा शाब्दिक कोटय़ांमुळे नाही तर त्यांच्या टायमिंग, शब्दफेक आणि विनोदात असलेल्या इनोसन्समुळे. एकदा दादा 'ऑल द बेस्ट'च्या प्रयोगाला आले होते. प्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी माझं मुक्याचं काम प्रचंड आवडल्याचे सांगितले. 'मुका घ्या मुका'मध्ये त्यांनीही मुक्याची भूमिका केली होती. त्या वेळच्या आठवणीही सांगितल्या होत्या.'' भरत जाधवची ही पोस्ट व्हायरल होत आहे. दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 साली झाला होता. त्यांचे सलग नऊ चित्रपट 25 आठवडे चित्रपटगृहांमध्ये चालले होते. या रेकॉर्डची गिनीज बुकात नोंद आहे.