प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या किंगफिशर हाऊसची विक्री करण्यात आली आहे. कर्जवसूली न्यायाधिकरणाने हैदराबादच्या सँटर्न रियल्टर्सला 52.25 कोटींमध्ये याची विक्री करण्यात आली आहे. देशातून पलायन केलेल्या आर्थिक घोटाळेबाज विजय मल्ल्याच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे ते मुख्यालय होते. या हाऊसच्या विक्रीसाठी 9 वेळा लिलावाचे प्रयत्न करण्यात आले होते. 9 व्या प्रयत्नात याच्या निर्धारीत मूल्यापेक्षा एक तृतीयांश किंमतीत ते विकण्यात आले आहे. त्याची 135 कोटींची किंमत ठरवण्यात आली होती.
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विलेपार्ले भागात किंगफिशर हाऊस आहे.याचे वास्तविक मूल्य 150 कोटी आहे. याच्या विक्रीसाठी नोव्हेंबर 2019 मध्ये आठव्यांदा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी याच्या खेरदीसाठी कोणीही पुढे आले नाही. अखेर नवव्या लिलावावेळी किंगफिशर हाऊस 52.25 कोटींमध्ये विकण्यात आले आहे. याच्या विक्रीतून आलेली रक्कम मल्ल्याला कर्ज दिलेल्या बँकांना देण्यात येणार आहे.
ब्रिटनमधील एका न्यायालयाने मल्ल्याला दिवाळखोर घोषित केले आहे. याआधी डेट रिकव्हरी ट्रिब्यूनलने युनायटेड ब्रेवरीज लिमीटेडचे 5,800 कोटींच्या शेअरची विक्री केली होती. हे शेअर बँक घोटाळ्याप्रकरणी मनी लॉडरिंगविरोधी कायद्यतंर्गत जप्त करण्यात आले होते. देशातील बँकेचे पैसे बुडवून फरार झालेल्या मल्ल्याची संपत्ती तपास यंत्रणांकडून जप्त करण्यात आली आहे.
मनी लॉडरिंग विरोधी कायद्यातंर्गत ईडीने फ्रान्समधील मल्ल्याची 14 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मल्ल्याच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला. त्यातून एसबीआयच्या नेतृत्वाखालील विविध बँकांना 5800 कोटी रुपये मिळाले आहेत.