प्रेस मीडिया वृत्तसेवा :
राळेगणसिद्धी : मंदिरे सुरू करा नाही तर जेलभरो आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांची भेट घेतली.त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी आदिती यांनी अण्णांना कोरोनाची परिस्थितीही समजावून सांगितली. मात्र, अण्णांनी आंदोलन मागे घेण्याबाबतचं कोणतंही ठोस आश्वासन आदिती तटकरे यांना दिलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे अण्णाचं आंदोलन होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज भेट घेतली. अर्धा तास आदिती तटकरे यांनी अण्णांसोबत चर्चा केली. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे देखील उपस्थित होते. आमदार झाल्यापासून अण्णांची भेट घ्यायची होती. मात्र कोरोनामुळे ते शक्य झालें नव्हते. त्यामुळे अहमदनगरमध्ये आल्यावर अण्णांची सदिच्छा भेट घेतल्याचे तटकरे यांनी सांगितले.
अण्णांना भेटून प्रेरणा मिळाली
अण्णांच्या तब्येतीची विचारपूस करून विविध विषयांवर चर्चा केल्याचे देखील तटकरे यांनी सांगितले. अण्णांना भेटून एक चांगली प्रेरणा मिळाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
अण्णांचा इशारा काय?
दरम्यान, अण्णा हजारे यांनी सरकारला मंदिरे उघडण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे. मंदिरांमधून सात्विक विचार मिळतात. अशा ठिकाणांना बंद करून सरकारने काय मिळवले? आगामी 10 दिवसांत सरकारने मंदिरं अघडण्याचा निर्णय घेतला नाही तर मोठे आंदोलन करा. मी तुमच्या सोबत आहे, असे आवाहन हजारे यांनी जनतेला केले आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार मंदिरांबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला 10 दिवसांची मुदत दिलेली आहे.
दारूची दुकाने, हॉटेलमध्ये कोरोना पसरत नाही का?
राज्यातील मंदिरांमध्ये गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्य सरकारने सर्व मंदिरं बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे मंदिरं उघडण्यात यावीत ही मागणी जोर धरु लागलीय. विरोधी पक्षाचे नेते मागील अनेक दिवसांपासून ही मागणी करत आहेत. आता यामध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यात यावेत अशी जाहीर मागणी केली आहे. तसेच राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे. राज्यात दारूची दुकाने, हॉटेल सर्व सुरु आहेत. या ठिकाणीसुद्धा गर्दी होते. मग येथे कोरोना पसरत नाही का? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.