राजकारणी लोकांनी अशी थापेबाजी बंद करावी, असा जालीम डोस डॉ. सायरस पुनावाला यांनी दिला आहे.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 सप्टेंबरपर्यंत 45 कोटी डोस मिळतील आणि डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी घोषणा मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. मात्र, हे शक्य नसल्याचे स्पष्ट मत सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांनी मांडले. राजकारणी लोकांनी अशी थापेबाजी बंद करावी, असा जालीम डोसही त्यांनी दिला आहे.

डॉ. सायरस पुनावाला यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वर्षाअखेरीस देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल आणि सप्टेंबरपर्यंत 45 कोटी डोस मिळतील असे सांगितले जात आहे.याबाबत पत्रकारांनी विचारले असता डॉ. पूनावाला म्हणाले, राजकारणी लोक हे थापा मारतात, आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचे उत्पादन घेत आहोत. हे काही सोपे काम नाही. यामध्ये कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आम्ही महिन्याला 10 कोटीप्रमाणे वर्षाला 110 ते 120 कोटी डोसचे उत्पादन होईल. जगातली कुठलीही कंपनी इतके उत्पादन करू शकत नाही.

'कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा वेगवेगळ्या लसींचे मिक्सिंग दोन डोस घेण्याचा पर्याय चुकीचा असल्याचे पुनावाला म्हणाले. कोरोनाची तिसरी लाट तीव्र नसेल, असे वाटते. सामुदायिक रोग प्रतिकारशक्ती आणि लसीचे संरक्षण असल्याने लाट आली तरी तिची तीव्रता कमी असेल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'लॉकडाऊन लावणे योग्य नाही. सरकारने लॉकडाऊन लावूच नये. कोरोना मृत्यूदर खूपच कमी आहे. मृत्यू जर वाढत असतील, तरच लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारावा', असा सल्लाही डॉ. पूनावाला यांनी दिला.

केंद्र सरकारच्या लस निर्यातबंदीच्या धोरणावर डॉ. पूनावाला यांनी बेधडक टीका केली. ते म्हणाले, 'माझा मुलगा म्हणाला होता की, यावर बोलू नका, पण मी बोलणार. केंद्र सरकारने लस निर्यातीवर घातलेली बंदी योग्य नाही. मोदी सरकारने हा निर्णय घेऊन अतिशय वाईट केले. निर्यातबंदी उठवली पाहिजे. कारण अन्य देशांतील नागरिकांनादेखील लसीची गरज आहे. सीरम इन्स्टिटय़ूट आजवर जगातील 170 देशांना लस पुरवत आली आहे. पण निर्यात बंदीमुळे आता गरज असताना आम्ही त्यांना लस पुरवू शकत नाही असे पुनावाला यांनी सांगितले.

तिसरा डोस गरजेचा

कोविड प्रतिबंधक लसीचे केवळ दोन डोस पुरेसे होतीलच असे नाही. दोन डोस घेतल्यानंतरही सहा महिन्यांनंतर व्यक्तीच्या शरीरातल्या अँटीबॉडीज कमी होतात. त्यामुळे दोन डोसनंतर तिसरा बूस्टर डोस गरजेचा आहे. असे डॉ. पूनावाला यांनी सांगितले.

सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांना यंदाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणती रोहित टिळक उपस्थित होते.

पुण्याला अधिक लस देण्यास तयार

  • पुणे शहरात कोरोना रुग्ण सर्वाधिक असल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर आम्ही पुण्यात लस अधिक देण्यात यावी, असे केंद्र सरकारला लिहिले होते. आमची पुरवठा करण्याची तयारीदेखील होती. मात्र, मोदी सरकारने अद्याप त्यावर उत्तर दिले नसल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post