प्रेस मीडिया वृत्तसेवा :
राज्यातील भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत अचानक धाव घेतल्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद टिकवण्यासाठी धडपड सुरू केली आहे, तर पक्षातील तरुण नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशीष शेलार व चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे.
भाजपच्या घटनेनुसार प्रदेशाध्यक्ष पदाची नियुक्ती तीन वर्षांसाठी असते. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती जुलै 2019 मध्ये झाली आणि जुलै 2021 पर्यंत त्यांची टर्म आहे. भाजपच्या नेत्यांच्या गेल्या काही दिवसांत दिल्लीवाऱ्या वाढल्या आहे.मागील महिन्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आले. या भेटीत देवेंद्र फडणवीस व पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत अचानक धाव घेतली. त्यांच्यापाठोपाठ पक्षाचे नेते आशीष शेलार व चंद्रशेखर बावनकुळे हे दोघे दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी आशीष शेलार व चंद्रशेखर बावनकुळे यांनी लॉबिंग सुरू केले अशी चर्चा आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या बदलाची चर्चा प्रदेशाध्यक्ष बदल का
चंद्रकांत पाटील यांच्या कारकीर्दीत विधान परिषदेची निवडणूक झाली. विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहा मतदारसंघांत झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. नागपूर व पुणे पदवीधर मतदारसंघांतील हातची जागा भाजपने गमावली. पुण्यातील पराभव हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी धक्का होता. कोल्हापूर जिह्यातील खानापूर या चंद्रकांत पाटील यांच्या गावातील ग्रामपंचायतीवर भाजपला झेंडा फडकवता आला नव्हता. खानापूरमध्ये शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळवला. हा पराजयसुद्धा चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का होता. गावची ग्रामपंचायत ज्याला आणता आली नाही त्याचे प्रदेशाध्यक्ष काय कामाचे, असा टोला त्यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मारला होता. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेंद्रीय मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेऊन पेंद्रीय मंत्रिमंडळात बदल करून अनेक दिग्गजांना धक्का दिला आहे. त्याच धर्तीवर आता प्रदेशाध्यक्षांच्या कामाचा आढावा घेऊन बदलाचे वारे वाहू लागल्याचे सांगण्यात येते. मात्र भाजपच्या नेत्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
दिल्लीच्या भेटीत काहीही राजकीय हेतू नाही. देवेंद्र फडणवीस व आशीष शेलार हे राज्याचे विषय घेऊन दिल्लीला येत असतात. विविध कामांचा पाठपुरावा असतो. दिल्लीत मी आलो त नवीन मंत्र्यांची खाती पाहण्यासाठी आलो आहे आणि पक्षाच्या नेत्यांसोबत बैठका होतच असतात.