प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन मिळाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पुणे तसेच नाशिक पोलिसांनी राणेंचा ताबा मागितला नाही, त्यामुळे नारायण राणे यांच्यासाठी हा एक दिलासाच मानला जात आहे.नारायण राणे यांना अटक केल्यानंतर रात्री उशिरा महाडमध्ये आणण्यात आलं, त्यानंतर महाडच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्यांना हजर करण्यात आलं. यावेळी नारायण राणे यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. राणेंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर महाड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी राणेंना जामीन मंजूर करण्यात आला. यासाठी काही अटी देखील घालण्यात आल्या, मात्र वकिलांच्या युक्तिवादातील कारणामुळे जामीन मिळाल्याचं मानलं जात आहे.
राणेंच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला ?
नारायण राणे यांच्याकडून वकील आदिक शिरोडकर यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचे वय जास्त आगे, तसेच त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन मिळावा, अशी मागणी शिरोडकर यांनी केली होती. राणेंना कोणती औषधं सुरू आहेत याबाबतची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. ही परिस्थिती लक्षात घेता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास सुरु आहे आणि यावरची औषधं सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी न्यायालयात दिली.
दरम्यान, नारायण राणे यांना अटक करण्याआधी कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, असा युक्तिवाद देखील वकील आदिक शिरोडकर यांनी केला. शिरोडकर यांचा हाच युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. गुन्ह्याचं स्वरुपही न्यायालयानं लक्षात घेतलं असावं, असंही बोललं जातंय.