महापुराचे पंचनामे येत्या मंगळवारपर्यंत पूर्ण होतील... पालकमंत्री सतेज पाटील



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

गेल्या महिन्यात जिल्ह्यात आलेल्या महापुराचे पंचनामे येत्या मंगळवारपर्यंत पूर्ण होतील. यानंतर राज्य शासनाकडून आलेली मदत पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर जमा करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.सन 2019 नंतर यंदाही जिल्ह्याला महापुराचा प्रचंड फटका बसला. या रेकॉर्डब्रेक अतिवृष्टी व महापुरामुळे जिह्यातील सुमारे 80 गावांना पाण्याचा वेढा पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन पूरग्रस्तांना दिलासा दिला होता. महापुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर येत असून, बहुतांश पूरग्रस्त भागात नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही पूरग्रस्त भागात पाहणी करून पूरग्रस्तांना धीर देत पुनर्वसन करण्याची ग्वाही दिली आहे.

दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून जिह्यासाठी 17 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पूरग्रस्त भागांचे पंचनामे मंगळवारपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यानंतर राज्य शासनाकडून प्राप्त झालेली 17 कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर जमा करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावणार

पूरग्रस्तांना मदतीसाठी लावण्यात आलेले निकष जाचक असल्याचे काहींचे मत असले तरी हे प्रश्न चर्चेने सोडवण्यासारखे आहेत. त्यासाठी आंदोलन, मोर्चाची गरज नाही. शासनाला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. तसेच शहरातील 34 वॉर्ड पूरबाधित असून, राज्य शासनाकडून शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी मंजूर झालेला निधी दोन टप्प्यांत मिळणार आहे. पुराने बाधित झालेल्या भागांना प्राधान्य देऊन या ठिकाणची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post