प्रेस मीडिया वृत्तसेवा :
काही दिवसांपूर्वी मंत्रालयाबाहेर विषारी कीटकनाशके पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जी.टी. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते मात्र काल त्यांची प्राणज्योत मालावली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील मंचर गावातील सुभाष जाधव हे रहिवाशी होते.
सुभाष जाधव यांनी का केला आत्महत्येचा प्रयत्न?
जमिनीच्या व्यवहारात सुभाष जाधव यांची फसवणूक झाली होती. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांत न्याय मिळवण्यासाठी धाव घेतली. मात्र स्थानिक पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. यामुळे ते अस्वस्थ होते. पण त्यांनी न्याय मिळवण्यासाठी मंत्रालयात धाव घेतली. शुक्रवारी २० ऑगस्टला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सुभाष जाधव मंत्रालयाच्या परिसरात आले होते. मात्र सुभाष जाधव यांना मंत्रालयात प्रवेश नाकारला आणि त्यानंतर ते मंत्रालयाच्या गेटसमोरच विषारी कीटनाशके प्यायले. यामुळे ते जमिनीवर कोसळले. तिथे तैनात असलेल्या पोलिसांच्या ते नजरेस आले आणि त्यांना तातडीने जी.टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दोन दिवसांच्या उपचारांनंतर सुभाष जाधव यांचा मृत्यू झाला.
सुभाष जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले होते.