पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा मंत्र्याला कशाच्या आधारे मंत्रिमंडळात घेतले...? राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. अशी भाषा महाराष्ट्रात अशी भाषा कधीच कुणी वापरली नव्हती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा मंत्र्याला कशाच्या आधारे मंत्रिमंडळात घेतले?, असा सवाल करतानाच राणेंच्या वक्तव्याला तुमचं समर्थन करत आहात काय?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. 

जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करतानाच भाजपलाही काही सवाल केले. नारायण राणे यांच वक्तव्य निषेधार्य आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा वापरणे चुकीची आहे. राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय, असा टोला लगावतानाच महाराष्ट्रात शिवसेनेनं जबाबदारीनं वागायचं काम केलंय. कायदा कोणाला हाती घेऊ देणार नाही. राष्ट्रवादी याचं कसलंही समर्थन करणार नाही. गृहखात्याला याबाबत जास्त माहिती आहे. विधानाकडे बघितलं तर परिस्थिती समजू शकतो, असं पाटील म्हणाले.

ते मोदींचच वक्तव्य समाजवं लागेल

राणेंनी केलेलं वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य समजावं लागेल. कारण मोदींनीच त्यांना मंत्री केलं आहे. त्यामुळे राणेंच्या वक्तव्याचं फडणवीस आणि पाटील समर्थन करत आहेत का? असा माझा सवाल आहे, फडणवीस आणि पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी. नाही तर देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजप लागल्याचं चित्रं देशात जाईल, असं पाटील म्हणाले.

राज्यातील जनताही दुखावली

राणेंच्या वक्तव्याने केवळ शिवसैनिकच नाही तर राज्यातील जनताही दुखावली गेली आहे. हा आपण निवडलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा अवमान आहे, अशी भावना लोकांची झाली आहे. जेव्हा मुद्दे संपतात, तेव्हा लोक गुद्द्यावर येतात. भाजपचे मुद्दे आता संपले आहेत, यातून आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्यावेळी मतदानाची वेळ येईल तेव्हा लोक मतपेटीतून भाजपच्या विरोधात रोष दाखविल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

सरकार स्थिर

सरकार स्थिर आहे. सरकारला काही प्रॉब्लेम नाही. भाजप आमचं सरकार अडचणीत आणू शकत नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रयत्नाला दाद दिली नाही. सरकार व्यवस्थित काम करत आहे. विकासाच्या कामाला गती दिली जात आहे. काही घटना घडली की सरकार जाणार आहे, अशी आवई उठवली जाते. त्यालाही जनता कंटाळली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री झालेच नाहीत का?

यावेळी त्यांनी जन आशीर्वाद रॅलीची खिल्ली उडवली. जन आशीर्वाद कशासाठी? पेट्रोलच्या किंमती वाढल्या म्हणून… डिझेलच्या किंमती वाढल्या म्हणून… का गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून का देशात महागाई वाढवली म्हणून… आशीर्वाद जनतेने कशासाठी द्यायचा? महाराष्ट्रातून कधी मंत्री झाले नाहीत, केंद्रीय मंत्री कधी बघितले नाही? हे सगळंच हस्यास्पद आहे. जन आशीर्वाद यात्रेसाठी जनतेच्या दारात जात आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या कानाखालीच मारायला निघालेले हे लोकं आहेत म्हणून लोकं घाबरले आहेत. घरात बसले आहेत, मतदानाच्यावेळी बाहेर येऊन भाजपच्या विरोधात निषेध व्यक्त करतील, असंही ते म्हणाले. 


Post a Comment

Previous Post Next Post