राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 गेले काही दिवस थंडावलेला मान्सून पुन्हा सक्रीय होणार आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी असेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकणात पावसाचा जोर अधिक असेल. 19 ऑगस्टला काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तवून हवामान खात्याने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जुलै महिन्यात कोकण, सांगली, कोल्हापूर, सातारा परिसरात हाहाकार उडवून देणाऱया पावसाचा जोर ऑगस्टच्या सुरुवातीपासून कमी झाला आहे. पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला. आता बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.मुसळधार पावसाच्या हजेरीला ही अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. राज्याच्या अनेक भागांत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळेल, तर 19 ऑगस्टला काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तवत हवामान खात्याने याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार

उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सून पुन्हा सक्रीय होणार आहे. दिल्लीसह पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील पाच दिवस या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल. राजस्थान, उत्तर गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये 22 ऑगस्टपर्यंत मान्सून सक्रीय असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post