जागा आहे म्हणून घर बांधायचे असे चालणार नाही. त्याकरिता निसर्गाचा अभ्यास करायला हवा असा सल्ला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र घर बांधताना आता निसर्गाचा विचार करायला हवा. अलीकडचे रायगड जिल्ह्यात तळीये, खेड येथे पोसरे आणि चिपळूणात पेढे परशुराम येथे दरड कोसळून दुर्घटना घडल्या आहेत, त्यामुळे जागा आहे म्हणून घर बांधायचे असे चालणार नाही. त्याकरिता निसर्गाचा अभ्यास करायला हवा असा सल्ला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला.

तसेच महाआवास अभियानात रत्नागिरी तालुक्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्यपुरस्कृत ग्रामीण आवास योजनांमध्ये तालुकास्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट क्लस्टर आणि सर्वोत्तम घरकुल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत,सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, जि.प.चे माजी बांधकाम सभापती महेश म्हाप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, माजी सभापती प्रकाश रसाळ, ऋतुजा जाधव, गटविकास अधिकारी जाधव उपस्थित होते.

यावेळी महा आवास अभियान पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार प्रथम - राधिका कुळये शिवार आंबेरे, द्वितीय - निशा शिंदे, टिके, तृतीय - सुनिता मालप, सत्कोडी. प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम -शिवार आंबेरे, द्वितीय - साठरे, तृतीय - देवरे. प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट क्लस्टर - कोतवडे विभाग, रमाई आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार प्रथम - रणजीत जाधव, वरवडे, द्वितीय - अनिल यादव, चवे, तृतीय - मोहन पवार, सैतवडे. रमाई आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम - वळके, द्वितीय - हरचेरी, तृतीय - ओरी. सर्वोत्कृष्ट क्लस्टर - करबुड़े विभाग या सर्वांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post