प्रेस मीडिया वृत्तसेवा :
राज्यातील सुमारे दीडशे, नगर परिषदा, नगर पंचायती आणि नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभाग निहाय प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगातील राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत.बहुसदस्यीय प्रभागपद्धती ऐवजी एकसदस्यीय प्रभागपद्धती लागू करण्यात आली असून प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल. तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली 2011ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार सदस्यसंख्या निश्चित करून तेवढय़ा प्रभागाच्या प्रारूपरचनेचा कच्चा आराखडा करण्यात यावा, मागास प्रवर्ग आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आरक्षणासंदर्भात कार्यवाही करायची असल्याने प्रारूप प्रभाग प्रसिद्धी व आरक्षण सोडत कार्यक्रमांमध्ये त्याबाबतच्या सूचना देण्यात येणार आहेत. प्रभागरचना करताना त्याची गोपनीयता न राखल्यामुळे व नियमांचे काटेकोर पालन न केल्यामुळे प्रभागरचने विरुद्ध हरकती आणि याचिकांची संख्या वाढते. त्यामुळे अकारण उद्भवणारी न्यायालयीन प्रकरणे आणि या सर्वांमुळे होणारा विलंब टाळणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष प्रभागरचना आरक्षण तसेच सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून काढण्यात येणार आहे, असे आयोगाने नमूद केले आहे.
प्रगणक गटाचा 2011 जनगणनेची आकडेवारी व नकाशे गोळा करावेत त्यानुसार नगर परिषद व नगर पंचायतीची सदस्यसंख्या निश्चित करण्यात यावी, कच्चा आराखडा तयार करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभागरचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, संगणकतज्ञ तसेच आवश्यकतेनुसार मुख्याधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, क्षेत्रीय अधिकाऱयांकडून अनेकदा चुका होतात. राजकीय दबावाला बळी पडून रचना केली जाते. अशामुळे अलीकडच्या काळात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून खबरदारी घेण्यास आयोगाने सांगितले आहे. कच्चा आराखडा जतन करण्यात येईल व आरक्षण सोडतीच्या दिनाकांपर्यंत याची गोपनीयता राखली जावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
23 ऑगस्टपूर्वी कच्चा आराखडा
प्रभागरचना आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी व मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेणे शक्य व्हावे यासाठी सध्या प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करून 23 ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाला तत्काळ पाठवावा, असे नमूद केले आहे.
या नगर परिषदा व नगर पंचायतींनाही लागू
राज्यातील नगर परिषदा व पंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग निहाय प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुदत संपणाऱया नगर परिषदा व नगर पंचायतींचाही समावेश आहे.