प्रेस मीडिया वृत्तसेवा :
महापुराचा फटका जिह्यातील अनेक गावांना व शहरातील काही भागाला बसला आहे. यात नागरिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. भविष्यात पुरामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्व पूरबाधित नागरिकांचे तीन वर्षांत शासकीय जमिनीवर पुनर्वसन करण्यात येईल. यावर्षी 30 टक्के, पुढील वर्षी 30 टक्के त्यानंतर त्यापुढील वर्षी उर्वरित सर्व नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.भुदरगड तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून या संदर्भात गारगोटी प्रशासकीय इमारतीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली.यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, पंचायत समिती सभापती अक्काताई नलवडे, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, तहसीलदार अश्विनी अडसूळ, गटविकास अधिकारी सरिता पवार आदी पदाधिकारी व पूरबाधित नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, पूरपरिस्थितीत प्रशासनाने बाधित नागरिकांचे जलदगतीने स्थलांतर केल्यामुळे जीवितहानी टाळता आली. भुदरगड तालुका कोरोनामुक्त होण्यासाठीही प्रशासनाने चांगले काम केले आहे. अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे आणि भूस्खलनामुळे नुकसान होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. ओढय़ांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याबरोबरच कोणावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्या. घरे, शेतीपिकांबरोबरच विहिरीच्या नुकसानीच्याही नोंदी घ्याव्यात. बाधित लाभार्थ्यांचे पुनर्वसन करताना त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने यादी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.पूरबाधित गावांतील नागरिकांचे गतीने पुनर्वसन करण्यावर भर देणार असून, यासाठी नागरिकांचेही सहकार्य गरजेचे आहे. पूरबाधितांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. भूस्खलनाचा धोका असणाऱया नागरिकांची गायरान जमिनीवर तत्काळ तात्पुरत्या निवाऱयाची व्यवस्था करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
ओढय़ांची पूररेषा निश्चित करणे आवश्यक
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, भुदरगड परिसरात दरवर्षी होणाऱया प्रचंड पावसामुळे दरडी कोसळणे, रस्ते खचणे, घरांची पडझड होत आहे. नद्यांप्रमाणे ओढय़ांची पूररेषा निश्चित करणे आवश्यक आहे. डोंगराळ भागात राहणाऱया नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
भुदरगड, आजरा तालुक्यांतील पूरबाधित गावांची पाहणी
यंदा पूरपरिस्थितीत भुदरगड, आजरा तालुक्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. या तालुक्यांतील नुकसानग्रस्त भागाची आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी करून पूरबाधितांशी संवाद साधला. या पाहणी दौऱयात भुदरगड तालुक्यातील कूर, कोणवडे, शेणगाव, तर आजरा तालुक्यातील उत्तुर, साळगाव, गजरगाव या गावांना भेटी देऊन पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. पुरामुळे झालेल्या घरांची पडझड, पोल्ट्रीचे नुकसान, ऊस, भात व अन्य पिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. तसेच, पूरबाधितांच्या अडचणींबाबतची निवेदने स्वीकारली.