प्रेस मीडिया वृत्तसेवा -
लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वसामान्यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून लोकल प्रवासाचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. यासाठी रेल्वे स्थानकांवर लसीच्या कागदपत्रांची ऑफलाइन पडताळणी 11 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी मध्य रेल्वेवर 22,689 आणि पश्चिम रेल्वेवर 11,664 अशा 34,353 पासेसची विक्री झाली तर दुसऱया दिवशी मध्य रेल्वेवर 22,104 आणि पश्चिम रेल्वेवर 10,430 अशा 32,534 पासची विक्री झाली असून दोन दिवसांत एकूण 66,887 रेल्वे पासची विक्री करण्यात आली आहे. तर आज तिसऱया दिवशी मध्य रेल्वेवर सायं. 6 वाजेपर्यंत 14,328 पासची तर पश्चिम रेल्वेवर 5,773 पास अशी एकूण 20,101 पासची विक्री झाली आहे.या अडीच दिवसांत एकूण 86,887 रेल्वे पासची विक्री करण्यात आली आहे.
दोन्ही लसी घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. लोकल प्रवासासाठी लसीकरण पूर्ण झालेल्या कागदपत्रांची पडताळणी बुधवारपासून विविध स्थानकांवर सुरू असून अशा पात्र नागरिकांना रेल्वेचा पास विकला जात आहे. गुरुवारपासून ऑनलाइन पडताळणी सुरू करण्यात आल्याने आता पास काढणाऱयांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. दोन्ही लसी झालेल्या नागरिकांची संख्या 19 लाख इतकी आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या सुमारे 16 लाख तर मध्य रेल्वेवर 22 लाख अत्यावश्यक सेवेतील प्रवासी प्रवास करीत आहेत. 15 ऑगस्टपासून दोन्ही लसीचे डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली असल्याने प्रवाशांची संख्या वाढणार आहे.