प्रेस मीडिया वृत्तसेवा -
आजपासून सुरू झालेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा खेळखंडोबा झाला असून पहिल्याच दिवशी वेबसाईट सुरळीत सुरू नसल्याने अर्ज अपलोड करण्यास विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. याआधीच अकरावीच्या सीईटीसाठी अर्ज भरतानाचे परिश्रम वाया गेल्याने विद्यार्थी नाराज असताना शिक्षण विभागाच्या या गोंधळावर संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड ,नाशिक, नागपूर आणि अमरावती या पाच महापालिका क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरू झाली. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रवेश प्रक्रियेचे उद्घाटन केले.त्यानंतर नोंदणी करताना विद्यार्थ्यांना वेबसाईट चालत नसल्याने त्याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांचे अर्ज अपलोड होत नव्हते तर अनेकांना अर्ज भरल्यानंतरही त्यांचे हे अर्ज अपूर्ण भरले जात होते.
94 हजार 447 विद्यार्थ्यांची नोंदणी
सकाळपासून अकरावी ऑनलाइन प्रवेशाची वेबसाईट सुरळीत सुरू होती. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी समोर आल्याचे शिक्षण संचालनालयाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. पहिल्याच दिवशी 94 हजार 447 विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तर 24 हजार 649 अर्जांचे व्हेरिफेकशन पूर्ण झाले आहेत.