प्रेस मीडिया वृत्तसेवा :
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारायचीच, असा ठाम निर्धार करत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशातील 19 राजकीय पक्षांनी आज 'राष्ट्रीय एकजुटी'चे शक्तिप्रदर्शन केले.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या या बैठकीत 20 ते 30 सप्टेंबरदरम्यान मोदी सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते या बैठकीत सहभागी झाले होते.
गैरभाजपवाल्या राज्य सरकारांना केंद्राकडून त्रास दिला जात असल्याकडे सर्वच मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. म्हणूनच सर्वांनी एकत्र येऊन केंद्र सरकारचा सामना करावा असेही त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, बैठकीत उपस्थित सर्व 19 पक्षांनी 20 ते 30 सप्टेंबरदरम्यान देशभर केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेतला. या व्हर्च्युअल बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते.
या बैठकीनंतर विरोधकांनी संयुक्त निवेदन जारी केले. कृषी कायदे रद्द करणे, शेतकऱयांना किमान आधारभूत किंमत देणे व ती अनिवार्य करणे, याचबरोबर जम्मू-कश्मीरध्ये तिथल्या त्रिभाजनानंतर जे राजकीय कैदी म्हणून केंद्र सरकारने तुरुंगात डांबले आहे. त्यांची सुटका व्हावी, महाराष्ट्रात भीमा-कोरेगाव हिंसाचारात अटक करण्यात आलेल्यांची सुटका केली जावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात आंदोलन केलेल्या आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये खुल्या वातावरणात तातडीने निवडणुका घेण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात ज्या पद्धतीने सरकारने संसदीय प्रथापरंपरांचे अवमूल्यन केले त्याचीही निंदा या निवेदनात करण्यात आली आहे.
भाजपला भिडण्यासाठी कोअर ग्रुप तयार करा - ममता बॅनर्जी
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला भिडण्यासाठी कोअर ग्रुप तयार करण्याचे सुचवले. हा कोअर ग्रुप तयार करून पुढील रणनीती ठरवण्यासाठी एकत्र काम करूया. या कोअर ग्रुपची दर तीन-चार दिवसांनी बैठक व्हावी. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे सोनिया गांधी किंवा राहुल गांधी हे कोअर ग्रुपचे नेतृत्व करतील. विरोधी पक्षांनी आपआपसांतील मतभेद बाजूला ठेवून भाजप सरकारशी निकराने लढा द्यावा, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी व्हर्च्युअल बैठकीत केले.
लोकशाही व धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असणाऱयांनी एकत्र यावे, शरद पवार यांचे आवाहन
ज्यांचा लोकशाही व धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे त्यांनी एकत्र यायलाच पाहिजे. या सर्वांनी एक कालबद्ध कृती कार्यक्रम तयार केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांच्या बैठकीत केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची व्हर्च्युअल बैठक पार पडली. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.
बैठकीनंतर त्यांनी एक ट्विटही केले. देशातील सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने समान विचारधारेच्या विरोधी पक्षांची बैठक बोलावण्याच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. शेतकरी कित्येक महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. हिंदुस्थानसारख्या लोकशाहीप्रधान देशासाठी हे अस्वस्थ करणारे चित्र आहे. आपला देश अनेक समस्यांचा सामना करीत आहे. महागाई, आर्थिक मंदी, कोरोना, बेरोजगारी, सीमावाद, अल्पसंख्याकांचे प्रश्न अशा अनेक समस्यांना देश तोंड देत आहे. सध्याचे सरकार हे विविध प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असलेल्या, लोकशाहीची मूल्ये वाचवण्यासाठी एकत्र काम करण्यास तयार असलेल्या लोकांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे. सर्व मुद्दे एकाचवेळी हाताळण्याऐवजी प्राधान्यक्रम ठरवून एकेक प्रश्न सोडवला पाहिजे, तरच देशाचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ उज्ज्वल बनेल, असेही शरद पवार यांनी यावेळी सूचित केले.
कोण कोण सहभागी झाले…
- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, सीपीआय, सीपीएम, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रीय जनता दल, पीपल्स डेमॉव्रेटिक पार्टी, लोकतांत्रिक जनता दल, जनता दल सेक्युलर, राष्ट्रीय लोक दल, केरळ काँग्रेस (एम), डीएमके, एआययूडीएफ, व्हीसीके, आरएसपी आणि आययूएनएल.
- आम आदमी पार्टीला या बैठकीचे निमंत्रण नव्हते, तर समाजवादी पार्टी व बसपा या पक्षांनी बैठकीपासून सुरक्षित अंतर राखले.
संसदेबाहेर राजकीय लढाई लढावी लागेल
विरोधकांचे लक्ष्य 2024 ची लोकसभा निवडणूक हेच असायला हवे. स्वातंत्र्यलढय़ातील मूल्यांवर काम करणारे सरकार कसे स्थापन करता येईल यावर विचार होणे गरजेचे आहे. पेगॅससवर मोदी सरकारला चर्चा नको आहे. म्हणूनच संसद अधिवेशन वाया गेले. मात्र आता आपल्याला संसदेबाहेरही मोठी राजकीय लढाई लढावी लागेल, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
n पेगॅससचा गैरवापर, कोरोनाची केंद्र सरकारने बेदरकार पद्धतीने हाताळलेली स्थिती आदी मुद्दय़ांचाही ऊहापोह या बैठकीत करण्यात आला. विरोधी पक्षांच्या नेत्यांना मार्शल लॉकरवी धमकावण्याच्या सरकारी रणनीतीचाही या बैठकीत निषेध करण्यात आला. विरोधकांना त्यांचे मुद्दे मांडल्यापासून रोखले गेले त्याबद्दलही या बैठकीत सरकारचा निषेध करण्यात आला.