प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने लोणावळा परिसरात वीकेंड लॉकडाऊन लागू केलेला असला तरी आखाड पार्टी करण्यासाठी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली. लोणावळ्यातील रस्ते पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीने ओसंडून गेले होते.
सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. शनिवार, रविवारची सुट्टी आणि त्यातच गटारीचा जुळून आलेला योग यामुळे एन्जॉय करण्यासाठी मोठय़ा संख्येने पर्यटक लोणावळा, खंडाळा परिसरात दाखल झाले. मुंबई, पुण्यासह परराज्यातून आलेल्या पर्यटकांमुळे बहुतांश हॉटेल व बंगले हाऊसफुल झाले आहेत. लोणावळय़ात पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी आहे. तरीदेखील पर्यटक चेकपोस्टवर विविध कारणे सांगून पर्यटन स्थळांपर्यत जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.खंडाळा भागातील राजमाची पॉइंट, अमृतांजन पुलावरील डय़ुक्स नोज पॉइंट, सनसेट पॉइंट या ठिकाणी पर्यटक मोठय़ा संख्येने गर्दी करत सेल्फी घेताना दिसत होते.
महामार्गावर अपोलो गॅरेज ते मुनीर हॉटेलदरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पर्यटकांच्या वाहनांमुळे झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर पोलीस कर्मचारी व वॉर्डन काम करत होते. तर, भुशी धरण व लायन्स पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर लोणावळा धरणाजवळ शहर पोलिसांनी चेकपोस्ट लावला होता. पोलीस पर्यटनस्थळ बंदी आदेशाचे पालन करत पर्यटकांना माघारी पाठवत होते. असे असताना बुकिंग व अन्य कारणे सांगू्न पुढे जाणारे पर्यटक सहारा पूल व लायन्स पॉइंट परिसरात गर्दी करताना दिसून येत होते. पर्यटक एकीकडे एन्जॉय करण्यात तल्लीन असले तरी दुसरीकडे कोरोना नियमांची मात्र पायमल्ली झाली. कोठेही मास्कचा वापर नाही की सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही अशी परिस्थिती होती. रस्त्यावर पर्यटक विनामास्क फिरताना दिसत होते.