प्रेस मीडिया वृत्तसेवा :
नाशिकचे धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे व विक्रमवीर ओंकार हुपरे यांच्या कार्याचा यथोचित गौरव व सत्कार
कोल्हापूर, दि.२१ - सामाजिक असो वा राजकीय, कला असो वा क्रीडा, प्रशासन असो वा अन्य कोणतेही क्षेत्र अशा सर्वच पातळीवर रुईतील अनेकांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. इतकेच नव्हे तर अभिनव आणि उपक्रमशील कार्याच्या जोरावर रुईकरांनी आपली कीर्ती सर्वदूर पोहचवली आहे, नाशिकचे धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे आणि विक्रमवीर ओंकार हुपरे ही त्यापैकीच रत्ने आहेत,असे गौरवोद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले.*
*रुईचे सुपुत्र आणि नाशिकचे धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांनी पुरग्रस्तांना उभारी मिळावी याकरिता धर्मादाय संस्थांकडून ५१ लाखांची देणगी संकलित करुन ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली. त्याचबरोबर ओंकार हुपरे याने लाठी फिरवणे या मैदानी क्रीडा प्रकारात सलग आठ तासांचा विक्रम करुन रुईचे नाव जागतिक स्तरावर झळकवले आहे. या दोघांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन खासदार धैर्यशील माने यांनी रुईकर कॉलनीतील आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांचा कोल्हापुरी फेटा बांधून यथोचित सत्कार केला. त्यावेळी खासदार माने बोलत होते.*
*ते म्हणाले, धर्मादाय सहआयुक्त श्री.जयसिंग झपाटे यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत मिळावी याकरिता ५० लाख ७२ हजार रुपयांचे केलेले निधी संकलन कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे. मैदानी खेळाचा प्रसार करण्यासाठी अकॅडमी सुरु करण्याच्या ओंकार हुपरे यांच्या प्रयत्नाला साथ देतानाच शासनस्तरावर लागेल ती मदत करु, अशी ग्वाही खासदार माने यांनी यावेळी दिली. सत्काराबद्दल जयसिंग झपाटे आणि ओंकार हुपरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा सत्कार निश्चितच आम्हाला प्रेरणा देत राहील असेही ते म्हणाले. याप्रसंगी भाऊसाहेब फास्के, जयसिंग शिंदे, प्रा. राजाराम झपाटे आदी उपस्थित होते.*