प्रेस मीडिया वृत्तसेवा :
जयसिंगपूर दि. 27 ऑगस्ट राज्यातील पूरबाधित तसेच अतिवृष्टी बाधितांना 2019 च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पूरबाधीत व अतिवृष्टीबाधितांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.
राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापी, अद्यापही केंद्र शासनाने 2015 नंतर नुकसानभरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम 2019 च्या महापूरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. त्यामुळे पूरबाधित व अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे शेतीसह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, या नुकसानीमुळे शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते त्यामुळे या सर्व घटकांना नुकसानीच्या तुलनेत योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी आपण सातत्याने महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून केली होती, शिरोळ तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश आपण प्रशासनातील महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिले होते,
या दोन्ही विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी शिरोळ तालुक्यातील पंचनाम्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे, उर्वरित गावातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे, वारंवार येणाऱ्या महापुरामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत अडचणीत असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या घेतलेल्या चांगल्या निर्णयाबद्दल राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी व महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.