प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता. २२,कोणत्याही धर्मवेडाचे अतिरेकीकरण झाले की त्याचे तालिबानीकरणात रूपांतर होते. धर्मांध व परधर्मद्वेषी स्वरूपाचा धादांत खोटा प्रचार, लोकशाहीवादी स्वधर्मीयांच्याविरोधी विषारी व विखारी प्रचार, बुरसटलेल्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आधुनिक समाजमाध्यमांचा स्वतंत्र यंत्रणेद्वारे प्रभावी वापर, अद्यावत शस्त्रसामुग्री,काळ्या पैशांची प्रचंड अर्थव्यवस्था,आंतरराष्ट्रीय राजकारणात महासत्तांचे लांगुलचालन आणि जगभरातील धर्मांध विचारधारांशी वरून शत्रुत्व व अंतस्थ ऐक्य या आधारे सर्वार्थाने विषमतावादी व्यवस्था प्रस्थापित करणे हाच अफगाणिस्तान मधील तालिबान्यांच्या सत्ताकारणामागील अन्वयार्थ आहे.यातून अतिरेकी धर्मवेड सर्वनाशाकडेच नेत असते हा पुन्हा मिळालेला संदेश ध्यानात घेतला पाहिजे असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या सप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या 'तालिबान,सारे जग परेशान ' या लेखावर आधारित ही चर्चा आयोजित केली होती.
या चर्चेत तालिबानी विचारधारा,त्यांचा इतिहास,धर्मांधतेचा सर्वत्र वाढता अतिरेक , धर्म व राजकारण यांची सांगड, भारताचे बदलते परराष्ट्र धोरण, आपली शक्तीस्थाने व मर्यादा, आंतरराष्ट्रीय परिस्थिती व देशांतर्गत वातावरण ,प्राधान्य क्रमाचे प्रश्न,दहशतवादाचा बिमोड , भारताची भूमिका आदी विविध मुद्दे तपशिलाने चर्चिले गेले.या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर,राहुल खंजिरे, प्रा.रमेश लवटे ,तुकाराम अपराध , दयानंद लिपारे,अशोक केसरकर,पांडुरंग पिसे ,शकील मुल्ला,मनोहर जोशी,सचिन पाटोळे, महालिंग कोळेकर,अशोक माने,आनंद जाधव आदींनी सहभाग घेतला.