प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८५०८ ३०२९०)
समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापने पासूनच्या ज्येष्ठ मार्गदर्शक , मराठीतील ख्यातनाम लेखिका, लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रा पर्यंतचा संशोधक संदर्भ कोष, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या सूक्ष्म अभ्यासक , भारतीय संस्कृती पासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक ,साहित्यापासून सामाजिक चळवळीच्या नामवंत अभ्यासक , मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका आणि आईचा ममत्वभाव जपणाऱ्या व मातृस्थानी असणाऱ्या सर्वार्थाने आदरणीय डाॅ. तारा भवाळकर उर्फ ताराबाई यांना अतिशय मानाचा असा 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार ' जाहीर झाला आहे.रुपये एक लाख आणि मानपत्र असे स्वरूप असणारा या जीवनगौरव पुरस्काराबद्दल मा.डॉ.तारा भवाळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा....
ताराबाईंचा व माझा स्नेह गेल्या पस्तीस वर्षाचा आहे.असंख्य कार्यक्रमात त्यांच्याबरोबर मी सहभागी झालो आहे. त्यांचा जीवनप्रवास उलगडणारी एक तब्बल आठ तासांची मुलाखत आकाशवाणी सांगलीमध्ये मी काही वर्षांपूर्वी घेतली होती.तसेच ' प्रातिभसंवाद ' या पुस्तकात डॉ.तारा भवाळकर यांनी डॉ.रा.चिं.ढेरे ते उमा व विरूपाक्ष कुलकर्णी आदींच्या घेतलेल्या मुलाखती आहेत तसेच त्यात डॉ.तारा भवाळकर यांची मी घेतलेली तब्बल दीडशे छापील पानांची मुलाखतही आहे.या जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने जिज्ञासूंनी ती जीवनप्रवास उलगडणारी मुलाखत जरूर वाचावी असे आवर्जून सुचवावेसे वाटते.
तसेच या निमित्ताने मी पूर्वी एकदा व्यक्त केलेले मत पुन्हा एकदा जाहीरपणे व्यक्त करतो की,डॉ.तारा भवाळकर यांना आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा उचित गौरव झाला पाहिजे.खरेतर हा सन्मान यापूर्वीच व्हायला हवा होता.पण साहित्य महामंडळ व संबंधित संस्थानी यावर्षी ती उणीव भरून काढावी असे प्रामाणिकपणे वाटते. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी साहित्यात संशोधन व लेखन स्वरूपाची चाळीसावर पुस्तकांच्या रूपाने सातत्यपूर्ण सकस भर घालणाऱ्या डॉ.तारा भवाळकर या वर्तमान महाराष्ट्रातील अग्रक्रमावरील विदुषी आहेत यात शंका नाही. अगदी गेल्या आठवड्यात त्यांचे " " "मायवाटेचा मागोवा " ( स्त्रीवादी दृष्टिकोनातून लोकसाहित्याचे पुनराकलन ) हे नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. अशा या थोर विदुषी डॉ.ताराबाईंना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन व भरभरून शुभेच्छा..!