प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. काँग्रेस भवनच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रसाद कुलकर्णी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले ,ब्रिटिश साम्राज्यवादा विरुद्ध १८५७ च्या लढ्याने रणशिंग फुंकले.टिळक युगाने त्यामध्ये हवा भरली आणि गांधी युगाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
सर्वांगीण शोषण करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त होऊन आपला स्वतंत्र भारत अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. प्राचीन इतिहास असलेल्या आपल्या देशासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे.स्वातंत्र्य मिळविल्यावर आपण भारतीय राज्यघटना हा महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज तयार करून त्याआधारे केलेली वाटचाल अतिशय स्पृहणीय आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी केलेले बलिदान आणि लाखोनी घेतलेला सहभाग यांच्या त्यागाचे स्मरण आपण केले पाहिजे.लोकमान्य टिळक, शहीद भगतसिंग,नेताजी सुभाषबाबू, राष्टापिता महात्मा गांधी,पंडित नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल,डॉ.बाबासाहेब आंबेककर अशा अनेक विचारवंत नेत्यांच्या स्वप्नातील भारत नव्याने उभारण्यासाठी सक्रिय प्रत्येकाने राहिले पाहिजे.
यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी, भारतीय स्वातंत्र्य आंदोलन, त्यातील महत्त्वाचे टप्पे, स्वातंत्र्य चळवळीतील विचारधारा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जनजागरण, विविध नेते व विचारवंत यांचे योगदान, १९४२ चे क्रांतीपर्व, स्वातंत्र भारताची राज्यघटना, गेल्या पाऊण शतकात भारताची झालेली उभारणी आणि आज काळाने निर्माण केलेली अनेक आव्हाने व त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग या संदर्भात अतिशय विस्तृत मांडणी केली.याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक शशांक बावचकर, राहुल खंजिरे, उद्योगपती विठ्ठलराव डाके, रेहमान खलीफा, तुकाराम पाटिल, महादेवराव कांबळे, रमेश श्रेष्टी, बाबासो कोतवाल, शशिकांत देसाई, शहर महिलाध्यक्षा सौ. मिना बेडगे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.