प्रेस मीडिया वृत्तसेवा :
बिद्री ता. १४ सर्वांगीण शोषण करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त होऊन आपला स्वतंत्र भारत अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. ही प्राचीन इतिहास असलेल्या आपल्या देशासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.स्वातंत्र्य मिळविल्यावर आपण भारतीय राज्यघटना हा महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज तयार करून त्याआधारे केलेली वाटचाल अतिशय स्पृहणीय आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी केलेले बलिदान आणि लाखोनी घेतलेला सहभाग यांच्या त्यागाचे स्मरण करून आपण आज माफिया भांडवलशाही आणि असहिष्णु धर्मांधता यांनी आणलेले मळभ दूर करणे गरजेचे आहे. ती शक्ती - ऊर्जा भारतीय लोकमानसात निश्चितच आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते दूधसागर महाविद्यालय (बिद्री) यांच्या वतीने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ऑनलाईन एकदिवसीय कार्यशाळेत " "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व सद्यस्थिती " या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.अनिल माने यांनी केले .यावेळी अग्रणी योजनेचे समन्वयक डॉ.डी.डी. कोमेजवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ही कार्यशाळा दूधसागर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित केली होती.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले ,ब्रिटिश साम्राज्यवादा विरुद्ध १८५६ च्या लढ्याने रणशिंग फुंकले.टिळक युगाने त्यामध्ये हवा भरली आणि गांधी युगाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या आधारे आपली वाटचाल सुरू आहे.ती संविधानिक मूल्ये प्राणपणाने जपणे गरजेचे आहे.नव भांडवलशाही व विकृत धर्मांधतेचा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा एक प्रकारचा दहशतवादच आहे. त्यातून आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पारतंत्र्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच स्वातंत्र्य चळवळीची मूल्ये आणि राज्यघटनेचे तत्त्वज्ञान या आधारेच वाटचाल करणे अत्यंत गरजेचे आहे. राजेशाही, साम्राज्यशाही यांच्याशी मुकाबला करून आपण संसदीय लोकशाही प्रस्थापित केली आहे.याचे भान ठेऊन कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीला विरोध करणे हे भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची भारतीय जनतेकडून ती मागणी आहे.
प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या मांडणीमध्ये भारतीय स्वातंत्र्य आंदोलन, त्यातील महत्त्वाचे टप्पे ,स्वातंत्र्य चळवळीतील विचारधारा ,राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जनजागरण , विविध नेते व विचारवंत यांचे योगदान ,१९४२ चे क्रांतीपर्व, स्वातंत्र भारताची राज्यघटना, गेल्या पाऊण शतकात भारताची झालेली उभारणी आणि आज काळाने निर्माण केलेली अनेक आव्हाने व त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग याची अतिशय विस्तृत मांडणी केली. तसेच 'स्वातंत्र्यदिन ' ही गझल सादर करून समारोप केला.या कार्यशाळेत अनेक महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते.प्रा. डॉ.एस.आर.पाटील यांनी आभार मानले.