बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील.....उपमुख्यमंत्री अजित पवार .



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

बारामती : बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील. त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच बारामती तालुक्यात सुरु असणारी विकासकामे दर्जेदार करण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वय राखत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.बारामती परिसरातील विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, अधीक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ पुणे प्रकाश भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना, संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सीजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर ५ टक्क्यांच्या पुढे वाढल्यास निर्बंध कडक करावे लागतील म्हणून सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. 

कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढता कामा नये. टाक्स फोर्सने सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यादृष्टीने सर्व नियोजन सुरु आहे. उपलब्ध ऑक्सिजनची आवश्यकता वाढण्याची शक्यता गृहित धरुन ऑक्सिजनचा साठा करुन ठेवणे आवश्यक आहे. ज्यांनी लसींचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देणे बंधनकारक करा. लसीकरणांचे नियोजन व्यवस्थित करावे.पहिला डोस घेतलेल्यांनाच प्रथम प्राधान्य द्या. बारामतीमध्ये एमआयडीसीमधील कंपन्यानी तसेच व्यापारी वर्गांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. संभाव्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित कराव्यात अशा सूचना त्यंनी दिल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. तरी नागरिकांनी मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post