इचलकरंजी प्रतिनिधी :
इचलकरंजी : इचलकरंजी- हातकणंगले मार्गावरील डेक्कन चौक परिसरात टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने झालेल्या अपघातात तरुण वहिफणी व्यावसायिक जागीच ठार झाला. नवनाथ राजाराम पोवार (वय 35 रा. पाण्याच्या टाकीजवळ जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.नवनाथ हा मोपेडवरून इचलकरंजीकडे येत असताना टेम्पोखाली सापडला. त्यामध्ये डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी शहापूर, शिवाजीनगर पोलिस तत्काळ हजर झाले. मुख्य मार्गावरच हा अपघात झाल्याने घटनास्थळी बघ्यांच्या गर्दीसह मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
नवनाथ पोवार हा वहिफणी व्यावसायिक होता. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जवाहरनगर येथून मोपेड (क्र. एमएच 09 ईडी 9127) कामानिमित्त शहरात येत होता. त्याचवेळी डेक्कन चौकात पुण्याहून इचलकरंजी शहरात येणार्या एका ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या माल वाहतूक टेम्पोखाली पोवार यांचे मोपेड वाहन सापडले. या अपघातात ते जमिनीवर कोसळल्यानंतर टेम्पोचे चाक नवनाथ याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र गणेश परीट हा जखमी झाला.
मुख्य मार्गावरच हा अपघात झाल्याने वाहतूकीची कोंडी होऊन लांबलचक रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी डेक्कन चौकातील वाहतूक कोंडी हटवून मार्ग वाहतूकीसाठी सुरळीत केला. पोलिसांनी अपघात टेम्पोसह (क्र. एमएच 12 एनएक्स 4164) चालक पांडुरंग साठे (रा. सातारा) याला ताब्यात घेतले आहे. मृत पोवार याच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.