प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मिरज येथील कृष्णा घाटावरील स्मशानभूमीत भटक्या कुत्र्याने चितेवर जळत असलेल्या प्रेताचा लचका तोडून रस्त्यावर आणल्याची घटना निदर्शनास आली आहे. या घटनेबाबत नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, याठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
मिरज येथे कृष्णा घाट स्मशानभूमी शहरापासून चार किलोमीटरवर आहे. या स्मशानभूमीमध्ये सुविधांची वानवाच आहे. अनेकवेळा येथे रात्री लाईट नसतात, नदीचे पाणी वाढले तर स्मशानभूमी पाण्यात जाते. याठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणाऱया नागरिकांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नाही. दहन करण्यासाठी येथे असणाऱया कट्टय़ांना जाळ्या नाहीत.तर, दोन्ही बाजूच्या दारांच्या कडय़ादेखील लागत नाहीत. मिरजेतील आधार सेवा संस्थेने याठिकाणी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, काही सुविधा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्या वतीने अध्यक्ष मोहन वाटवे हे सातत्याने महापालिका प्रशासनाकडे करीत आहेत. मात्र, अद्याप याठिकाणी 24 तास सुरक्षा रक्षकाची नेमणूक झालेली नाही.
दोन दिवसांपूर्वी याठिकाणी भटक्या कुत्र्याने प्रेताचा लचका तोडून रस्त्यावर आणून टाकल्याचे काही नागरिकांना निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तातडीने आधार संस्थेचे अध्यक्ष मोहन वाटवे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर वाटवे यांनी लगेचच मनपाच्या संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनपाची यंत्रणा वेगाने कामाला लागली व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी तेथे धाव घेऊन कुत्र्याने रस्त्यावर टाकलेल्या प्रेताच्या अवयवांची विल्हेवाट लावली.
24 तास सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी
मोहन वाटवे व नगरसेवक करण जामदार यांनी मनपा मिरज कार्यालयात उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेऊन कृष्णाघाट स्मशानभूमीसाठी 24 तास सुरक्षारक्षक नेमण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. तसेच याठिकाणी दहन करण्यासाठी बांधण्यात आलेल्या कट्टय़ांना जाळ्या बसविण्यात आल्यास कुत्र्यांकडून घडणारे हे प्रकार थांबतील असे सांगितले. त्यानुसार लवकरच जाळ्या बसविण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिले आहे.