प्रेस मीडिया वृत्तसेवा :
हृदयस्थ हृदयतज्ञ अर्थात डॉ. एम.ए. बोरगावे हे इचलकरंजी परिसरातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. वस्त्रनगरी इचलकरंजी आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे आणि स्वास्थ्याची हमी देणारे वैद्यकीय क्षेत्रातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बोरगावे.आज गुरुवार ता. ८ जुलै २०२१ रोजी डॉ. बोरगावेसाहेब वयाच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत. तसेच याच वर्षी त्यांच्या वैद्यकीय कारकीर्दीला ही पंचावन्न वर्षे पूर्ण होत आहेत.आणि वैवाहिक जीवनातही ते पंचावन्नव्या वर्षात पदार्पण करत आहेत.
इचलकरंजी शहरातील एम.डी फिजिशियन असलेले डॉ. बोरगावे हे पहिले व्यक्तिमत्त्व.अतिशय प्रसन्न, शांत, तेजस्वी आणि उमदे व्यक्तिमत्त्व लाभलेले डॉ.बोरगावे आणि त्यांच्या अर्धांगिनी मालिकाभाभी हे एक अनुभव समृद्ध आणि कमालीचा प्रेमळ दाम्पत्य आहे.डॉ.बोरगावे सरांची वाटचाल आजच्या समकालीन वास्तवात अनेक अर्थाने इतरांसाठी प्रेरणादायी देणारी आहे. एका गर्भश्रीमंत घरातील एक मालिका एमबीबीएस पदवी मिळवू पाहणाऱ्या महम्मदअलीशी विवाहबद्ध होते. आणि हे दांपत्य ५५ वर्षाची समृद्ध वाटचाल मुले, मुली, सुना,जावई ,नातवंडे, आप्तेष्ठ आणि माझ्यासारखे त्यांचे शेकडो सुहृद यांच्यासह सुरू आहे. ज्यांना पाहिल्यानंतरच रुग्णाला बरं वाटायला लागत असं हे व्यक्तिमत्व आहे.त्यांनी तपासणीसाठी केलेल्या स्पर्शानेच रुग्णाची आजारमुक्त व रोगभयमुक्त व्हायला सुरुवात होते.रुग्णाबरोबरच त्याच्या संपूर्ण कुटुंबियांची ममत्वाने चौकशी करून आधार देणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. बोरगावे सरांच्या अमृत महोत्सवानिमित्त मी चार वर्षांपूर्वी त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांचा जन्मापासून शिक्षणापर्यंतचा, तीन खोल्यात संसारासह दवाखाना सुरू करण्यापासून ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीपर्यंतचा आणि एकूण कोटुंबिक - - - वैद्यकीय वाटचालीचा विलक्षण प्रवास मला जाणून घेता आला. ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हजारो रुग्णांच्या हृदयरोगावर आणि अन्य व्याधींवर उपचार करता करता त्यांच्या हृदयात कायमचं घर डॉ.बोरगावे यांनी केलेले आहे. सालस आणि राजस अशा या व्यक्तिमत्त्वात विविध प्रकारच्या अनुभवांचा अथांग संचय आहे.महाविद्यालयीन जीवनात चित्रकारी, अभिनय यासह अनेक गुणांनी समृद्ध असलेले डॉ.बोरगावे उत्तम वाचक आणि शास्त्रीय संगीताचे रसिक आहेत. माझ्या वैचारिक लेखनावर व गझलांवर प्रेम करणारे डॉ.बोरगावे जेंव्हा अभिप्राय देतात तेंव्हा मनस्वी आनंद होतो. डॉ.बोरगावे साहेब या पितृतुल्य व्यक्तित्वाचा खुद्द माझी प्रकृतीही सुखरूप ठेवण्यात गेल्या दशकभरात अतिशय मोठा वाटा आहे. अंतर्बाह्य सदैव स्वच्छ व टापटीप असणारे डॉ. बोरगावे आज वयाच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना माझ्या,माझ्या परिवाराच्या आणि संपूर्ण समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या भरभरून शुभेच्छा.