सोलापुरातील यंत्रमाग उद्योग केवळ 60 टक्के क्षमतेने सुरू



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 सोलापूर :  तब्बल दोन महिने बंद असलेल्या यंत्रमाग उद्योगाला कोरोना प्रतिबंधक निर्बंधांत शिथिलता मिळाल्यानंतर दिलासा मिळाला असला, तरी अजूनही पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झालेले नाही. यंत्रमाग उत्पादनांची विदेशात काहीअंशी निर्यात सुरू असली, तरी देशांतर्गत मार्केट मात्र ठप्पच आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर देशांतर्गत, तसेच विदेशी मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू होऊन सोलापुरी यंत्रमाग उत्पादनांना मोठी मागणी येईल, अशी अपेक्षा येथील यंत्रमाग कारखानदारांना होती.

 सध्या काही प्रमाणात निर्यात सुरू असली, तरी देशांतर्गत मार्केट अद्यापि थंडच आहे. देशांतर्गत मार्केट मधून अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे सध्या सोलापुरातील यंत्रमाग उद्योग केवळ 60 टक्के क्षमतेने सुरू आहे.गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर यंत्रमाग उद्योगात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. ऑगस्टनंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर अल्प प्रमाणात यंत्रमाग उद्योग सुरू झाला. दिवाळीनंतर 70 ते 80 टक्के क्षमतेने उद्योग सुरू झाले. यंत्रमाग उद्योग पूर्वपदावर येत असताना, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि तब्बल दोन महिने पुन्हा लॉकडाऊन झाले. त्यामुळे यंत्रमाग उद्योगात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली. आता जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर हा उद्योग पूर्ण ताकदीने सुरू होईल. देशांतर्गत मार्केटमधून चांगली मागणी येईल, अशी अपेक्षा उद्योजकांना होती; परंतु कोरोनामुळे देशांतर्गत मार्केट अजूनही अस्थिरच आहे. अनेक ठिकाणी निर्बंध कायम आहेत. सोलापुरातील यंत्रमाग उद्योजकांना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्य़ातून ऑर्डर्स येत असतात; पण आता या ऑर्डर्स बंद झाल्या आहेत.

मागणीत 40 ते 50 टक्के घट

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ येथूनही सोलापुरी टॉवेल आणि चादरीला मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र, या ठिकाणीही कोरोनाचा कहर सुरू असल्याने मागणीत प्रचंड घट झाली आहे. केवळ 50 ते 60 टक्केच मागणी आहे. यंत्रमाग उद्योग देशांतर्गत मार्केटवर 70 टक्के निर्भर आहे. त्यामुळे देशांतर्गत मार्केट सुरू होणे उद्योजकांसाठी आवश्यक आहे; परंतु सध्यातरी मार्केट सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे यंत्रमाग कारखानदार चिंतेत आहेत.

दैनंदिन उलाढाल दोन कोटींनी घटली

सोलापुरात आठशेच्या आसपास यंत्रमाग कारखाने असून, यावर 35 हजार कामगारांची उपजीविका चालते. सध्या पाचशेच्या आसपास कारखाने अर्धवेळ सुरू असून, यांत 20 हजार कामगारांनाच, तेही अर्धवेळ काम मिळत आहे. उत्पादन कमी होत असल्याने दैनंदिन पाच कोटींवरील उलाढाल तीन कोटींवर आली आहे. उलाढालीत दोन कोटींची घट झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post