कृष्णेने धोक्याची 45 फुटांची पातळी ओलांडल्यानंतर कृष्णेचे पाणी काठावरच्या अनेक गावांत आणि सांगली शहरातील नागरी वस्तीत घुसले.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 पावसाने दिवसभर घेतलेली उसंत आणि कोयना, वारणा धरणांतून सोडण्यात येणाऱया पाण्याचा कमी करण्यात आलेला विसर्ग यामुळे तूर्त तरी सांगलीवरचा मोठा धोका टळला आहे. मात्र, कृष्णेची पाणीपातळी 52 फुटांवर गेल्याने कृष्णाकाठी आणि सांगली शहरात हाहाकार उडाला आहे. मारुती रोडवरची मुख्य बाजारपेठ व नागरी वस्तीत पाणी घुसले आहे. शहरातील 16 हजार कुटंबांसह जिल्ह्यातील सुमारे एक लाखांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 57 रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सलग तीन दिवस पावसाची संततधार आणि त्यात कोयना, वारणा धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा मोठा विसर्ग, यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाल्याने सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला.अवघ्या दोन दिवसांत कृष्णेने धोक्याची 45 फुटांची पातळी ओलांडल्यानंतर कृष्णेचे पाणी काठावरच्या अनेक गावांत आणि सांगली शहरातील नागरी वस्तीत घुसले. अनेकांची दाणादाण उडाली. मात्र, शनिवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने कोयना, वारणा धरणांमधून सोडण्यात येणाऱया पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सांगली जिल्ह्यावरचे मोठे संकट तूर्त तरी टळल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

कृष्णा नदीच्या पाणी पातळीने सायंकाळी 52 फुटांपर्यंत मजल मारली आहे. आज सकाळी सात वाजता पाणीपातळी 48.1 फूट होती. ती आठ वाजता 49 फुटांवर पोहोचली. त्यानंतर दर तासाला 4 इंचाने ती वाढत सायंकाळी पाच वाजता 50 फुटांवर गेली आहे. पाच वाजता मात्र पातळी वाढण्याची गती मंदावली असल्याचे दिसून येत होते. सायंकाळनंतर पाणी पातळी स्थिर राहील, असा विश्वास जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने दिला होता. 52 फुटांनंतर पाणीपातळी उतरण्यास सुरुवात होईल, असेही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांनी जाहीर केले होते. कराडनजीक पाणीपातळीत घट झाल्याचेही सांगण्यात आले.

आयर्विनजवळ कृष्णेची पातळी 52 फुटांवर

कृष्णा नदीची पाणीपातळी 52 फुटांवर गेल्याने पाणी मोठय़ा प्रमाणात नागरी वस्तीत घुसले. आज मारुती रोडवर तीन फुटांपर्यंत पाणी साचले. गावभाग, कोल्हापूर रोड, श्यामरावनगर, बसस्थानक परिसर, शिवाजी मंडई परिसर, टिळक स्मारक मंदिर परिसर, हरभट रोड, स्टेशन चौक, भारती विद्यापीठ परिसर, वखार भाग, जामवाडी, सर्किट हाऊस परिसरात पाणी घुसले. जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या अनेक गावांत विशेषतः शिराळा, वाळवा आणि पलूस तालुक्यातील अनेक गावांत पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर पाणी आल्याने 57 मार्गांवरची वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.

सांगलीत शिवसेनेकडून पूरग्रस्तांना जेवण

सांगली शहरातील 200 पूरग्रस्त नागरिकांना कुपवाड शहर शिवसेना आणि गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या वतीने आज भोजन देण्यात आले. यावेळी अमोल पाटील, सूरज कासलीकर उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील 1 लाखांवर नागरिकांचे स्थलांतर

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपट्टय़ातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 22 हजार 467 कुटुंबातील 1 लाख 5 हजार 683 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच, लहान व मोठी अशा एकूण 24 हजार 1 जनावरांचेही स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post