प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे. : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी महावितरणच्या पुणे परिमंडलातील तीन पथके मंगळवारी (दि. २७) सकाळी रवाना झाले. या तीन पथकांमध्ये २२ अभियंता व जनमित्रांचा समावेश आहे. यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुणे परिमंडलातून दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य देखील पाठविण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागामध्ये विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी या पथकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी या पथकांतील सदस्यांशी संवाद साधला. अतिशय खडतर परिस्थितीत वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करताना स्वतःचे आरोग्य व सुरक्षेकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, श्री. पंकज तगलपल्लेवार यांची उपस्थिती होती. या पथकांमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता विष्णू माने, सहाय्यक अभियंता सुधीर मसने, कनिष्ठ अभियंता सुरेश माने यांच्यासह १९ जनमित्रांचा समावेश आहे.