पिंपरी - कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ,या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पिंपरी - कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ताथवडे येथे शनिवारी (दि. 3) पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजेश मारुती साप्ते, असे आत्महत्या केलेल्या कला दिग्दर्शकाचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साप्ते कुटुंबिय मुंबई येथे वास्तव्यास आहेत. ताथवडे येथेही त्यांचा फ्लॅट आहे. राजेश साप्ते हे मुंबई येथून शुक्रवारी एकटेच त्यांच्या ताथवडे येथील घरी आले. त्यानंतर आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला. व्हिडिओबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.दरम्यान साप्ते यांच्या पत्नीने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी राजेश साप्ते यांनी घरात गळफास घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच राजेश साप्ते यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे चित्रपट सृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

राजेश साप्ते यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला. त्यामध्ये आत्महत्येचे कारण सांगितले आहे. ''नमस्कार मी राजेश मारुती साप्ते, मी एक आर्ट डिरेक्‍टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे.

हा व्हिडीओ बनवताना मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मौर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्‍ट अडकले आहेत.

माझं पुढचं काम राकेश मौर्या सुरू करू देत नाहीत. माझ्याकडे सध्या पाच प्रोजेक्‍ट आहेत. पण, राकेश मौर्या कामगारांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरू करता येत नाहीये. एक प्रोजेक्‍ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे', असे साप्ते यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. तसेच, मला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी याच व्हिडिओतून केली आहे.








Post a Comment

Previous Post Next Post