प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पालघर : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सलग अतिवृष्टी सुरू असल्यामुळे नदी-नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. शहरी भागांत अनेक परिसर पाण्याखाली गेले असून नागरिक व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
ग्रामीण भागाला या नैसर्गिक संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मेढा-सायवन रस्त्यावर पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली आहे. दरम्यान, उसगाव-भाताणे मार्गावर तानसा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असून सुमारे २० गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. वसई पश्चिमेस गास चुळणा हा रस्ताही गेले तीन दिवस पाण्याखाली आहे. सलग चार दिवस पाऊस कोसळत असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे बोटी किनाऱ्याला नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. सलग पाऊस पडत असल्यामुळे पाणी जलदगतीने ओसरत नाही. त्याचा परिणाम जनजीवनावर होऊ लागला आहे. पावसाने आता उसंत न घेतल्यास ग्रामीण व शहरी भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.सतत होत असलेल्या या पावसाने शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. परंतु, हा पाऊस आता थांबला नाही तर ओला दुष्काळ निर्माण होऊ शकतो, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. गेल्या २४ तासांत मोखाडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामागोमाग विक्रमगड तालुक्यातही चांगला पाऊस झाला.
शेलटे येथील पाझर तलाव फुटला
वाडा तालुक्यातील कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शेलटे या गावातील पाझर तलाव बुधवारी (दि. २१) रात्रीच्या सुमारास पाण्याच्या अतिदाबाने फुटले असून यात सुमारे ३५ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे.
येथील आठ-दहा घरांतही तलावाचे पाणी घुसल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू भिजून खराब झाल्या आहेत. काल रात्री गावातील ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. आज पुन्हा सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी आले आहेत. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शेलटे गावाची लोकसंख्या ५०० च्या आसपास असून गावाच्या वरच्या भागात लघुपाटबंधारे विभागाकडून पाझर तलाव बांधण्यात आला होता. तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने हे तलाव पूर्ण भरलेले होते. काल सायंकाळी जोरदार पाऊस पडल्याने पाण्याच्या अतिदाबाने तलाव फुटले आणि तलावातील पाणी घरात व शेतजमिनीत घुसले. शेतात माती व पाणी गेल्याने आताच भातलागवड केलेली शेती उद्ध्वस्त झाली.
गेल्या वर्षी या तलावाला एक भगदाड पडले होते. ते बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाला कळवण्यात आले होते, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला.
तुफानी पावसामुळे सूर्या नदीचा रौद्रावतार; मनोरला पुराचा विळखा; बाजारपेठेत शिरले पाणी
गेल्या आठवडा भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैतरणा आणि हात नदीला पूर आला आहे. पुरामुळे बुधवारी सायंकाळी मनोर पालघर रस्ता सावरखंड उपकेंद्र, हात नदी पूल आणि कोळसा पुलाजवळ पाण्याखाली गेल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. मनोर गावाला चारही बाजूंनी पुराचा पाण्याचा वेढा पडला होता. मनोर गावातील सनसिटी, मासळी बाजार आणि नवी बस्ती परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील वैतरणा नदी किनारी असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने अकरा वाजताच्या सुमारास मनोर पालघर रस्त्यावरील अवजड वाहतूक सुरू झाली आहे. जव्हार फाट्याजवळ बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे महामार्गावरून फक्त अवजड वाहतूक सुरू होती. रात्री दीड वाजताच्या सुमारास महामार्गावरील पाणी ओसरल्यानंतर पूर्ववत झाली.
जव्हार फाटा येथे महामार्गाच्या खालून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेल्या पाणी वाहून नेण्याची मोरीची क्षमता कमी असल्याने बुधवारी रात्री पावसाचे पाणी महामार्गावरून वाहत होते. मोरीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने जव्हार फाटा येथील सुहाना ढाब्यात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. तसेच, सावरखंड गावच्या हद्दीतील भाताचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मोरीच्या जागी साकव पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सावरखंड सब स्टेशनसमोर रस्त्यावर दोन चारचाकी गाड्या पाण्यात बुडाल्या होत्या. त्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते. दुसरीकडे, मनोर उपकेंद्राचा वीजपुरवठा बुधवारी सायंकाळपासून बंद आहे. त्यामुळे अनेक गावे अंधारात आहेत.
सावरे गावात बुडून महिलेचा मृत्यू
सावरे ग्रामपंचायत हद्दीतील एम्बुर गावच्या पाटील पाड्यात सुमन दिलीप दुतकर नामक महिलेचा शेतावरून घरी परतत असताना पाय घसरून नाल्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे.
एनडीआरएफची टीम दाखल
गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक महामार्गावर दाखल झाले आहे. एनडीआरएफचे निरीक्षक राजू यादव आणि उपनिरीक्षक सुरेंद्र राणा यांच्या नेतृत्वात २५ जवान, आठ बोटी आणि प्रथमोपचार किट उपलब्ध असलेली तीन वाहने दाखल झाली आहेत.
मोरी गेली वाहून
मनोर वेळगाव रस्त्यावरील अंभान गावालगत तात्पुरत्या स्वरूपात पाईप टाकून केलेला माती भराव पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. त्यामुळे मनोर वेळगाव रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.
वाड्यात पावसाचा धुमाकूळ; उमरोठोत घर कोसळले
कुडूस : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची सततधार सुरूच असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी घरांचे शेती व कंपनीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील उमरोठे येथील पांडुरंग वाघ यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले आहे. तर खरीवली येथील दीपक दिवा व संदीप मुकणे यांच्या दोघांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, दोन्ही घरांच्या नुकसानाचे पंचनामे तलाठी व ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांसमक्ष करून घेतले. त्याचवेळी येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बागुल यांनी या दोन्ही कुटुंबांना तत्काळ मदतीचा हात म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये आर्थिक स्वरूपात दिले. घोणसई येथील नाल्याला रात्री पूर आल्याने पुराचे पाणी नाल्याशेजारील भारतीय स्टील कंपनीत घुसले. या पाण्यामुळे कंपनीतील मशीनचे नुकसान झाले आहे. तसेच, चिंचघर येथील इन्व्हर्टर कंपनीत डोंगराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मुसळधार पाऊस : नागरिकांना सावधगिरीचा इशारा
गेल्या कित्येक दिवसांपासून कोसळत असणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक भागातील रस्ते खचल्याने तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली आहे. पालघरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मुख्य नद्या दुथडी भरून वाहत असून पाण्याची पातळी बघता नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
पालघरमधील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे दिवसभर नागरिकांना अंधारात राहावे लागले होते. काही परिसरात वीज खंडित झाल्याने पाणी येणे बंद झाले होते. बिडको कंपनी परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत यावे लागले. पालघर परिसरात सतत होत असणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. पावसामुळे लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने पावसाने आता उसंत घेण्याची लोक वाट पाहत आहे.