प्रेस मीडिया वृत्तसेवा :
नवी दिल्ली - अनेक बड्या मंत्र्यांचा राजीनामा, काही मंत्र्यांचा खांदेपालट आणि तब्बल ४३ मंत्र्यांचा शपथविधी यामुळे दिल्लीत सुरू असलेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच महाराष्ट्रामधून माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शपथ घेत असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही या शपथविधीकडे लक्ष होते. दरम्यान, नारायण राणेंचा शपथ विधी झाल्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.प्रतिक्रिया निलेश आणि नितेश राणे यांनी दिली आहे. तसेच नारायण राणेंवर सोपवलेल्या केंद्रीय मंत्रिपदाच्या जबाबदारीसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत.
नारायण राणे यांच्या शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निलेश राणे म्हणाले की, हा राणे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. एखादी जबाबदारी सोपवल्यावर नारायण राणे हे ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करतात. ही जबाबदारीही ते उत्तमपणे पार पाडतील.
नारायण राणे यांना अचानक केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही बाळासाहेब ठाकरे यांनी अचानकपणे सोपवली होती. मात्र अजूनही अधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाची आठवण काढतात. आताही तसंच होईल. ते जबाबदारी चोखपणे बजावतील. मंत्रिपद ही जबाबदारी आहे, असे निलेश राणे म्हणाले. यावेळी निलेश राणे यांना प्रसारमाध्यमांनी शिवसेनेबाबत नाव न घेता विचारले असता ते म्हणाले की, तुम्ही ज्यांना आमचा शत्रू म्हणून सांगत आहात त्यांना आम्ही किंमत देत नाही. नारायण राणेंचा नगरसेवका पासून केंद्रीय मंत्र्यापर्यंतचा प्रवास सोपा नाही आहे. आता जे मिळेल त्यावर आम्ही समाधानी आहोत.
तर नितेश राणे म्हणाले की, नारायण राणेंचा शपथविधी हा राणे कुटुंबीयांसाठी सुवर्णक्षण आहे. तसेच भाजपाचा कार्यकर्ता म्हणूनही हा महत्त्वाचा क्षण आहे. नारायण राणेंची प्रशासनावरील पकड चांगली आहे. तसेच राज्यभरात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे भाजपाला पुढील प्रत्येक निवडणूकीत १ नंबरचा पक्ष ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. राणेंच्या मंत्रिपदाचा संघटन म्हणून पक्षाला फायदा होईल. नारायण राणेंबाबत जे काँग्रेसला १२ वर्षांत कळलं नाही. ते भाजपाला कळलं. कार्यकर्त्यांची जाणीव असलेला भाजपा हा पक्ष आहे. त्याचा भाजपाला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असेही नितेश राणे यांनी सांगितले.