फोन टॅपिंगचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले , या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.....गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा ,: 

राज्यात 2016-17 या काळात झालेल्या फोन टॅपिंगचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या फोन टॅपिंगच्या मागील मुख्य सूत्रधाराचा शोध लावण्याची मागणी सत्ताधारी पक्षाच्या बाकांवरून करण्यात आली. त्यावर फोन टॅपिंगची बाब गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. 2016-17मध्ये राज्यातील आमदार, खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले. यासाठी माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला.हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सूत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

नाना पटोले पुढे म्हणाले की, अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लिम नाव ठेवण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बाद करण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न आहे. सभागृहातच अनिल देशमुख करू, छगन भुजबळ करू, अशा धमक्या दिला जात आहेत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चेत सुनील प्रभू, भास्कर जाधव, सुनील केदार, रवींद्र वायकर, जयंत पाटील आदींनी भाग घेतला.

खंडणी वसुलीवर आज बैठक

या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन दिले. कलादिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली. युनियनच्या माध्यमातून त्यांना त्रास दिला जात होता. हे चित्रपट व्यवसायाला घातक आहे. या विषयावर उद्या बुधवारी दुपारी चार वाजता पोलिस व संबंधित विभागाची बैठक आयोजित केली आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.

फोन टॅपिंग भयावह

ज्या पद्धतीने फोन टॅपिंग केले ते भयावह आहे. अजून कोणाचे फोन टॅप झाले ते पुढे आले पाहिजे, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. भविष्यात सर्वच लोकप्रतिनिधींचे फोन टॅप होतील, अशी भीती सुनील प्रभू यांनी व्यक्त केली.

फिल्मसिटीतील चौकशी

रवींद्र वायकर यांनी यानिमित्ताने फिल्मसिटीतील घटनांची चौकशी करण्याची मागणी केली. खंडणी वसुलीसाठी चित्रपट डायरेक्टरना धमक्या येत आहेत, याकडे लक्ष वेधले.

व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा

ईडी, सीबीआय चौकशी लावते असे विरोधी पक्षाचे नेते सांगतात. केंद्रीय एजन्सी फोन टॅप करीत असेल तर गंभीर आहे. ही व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post