प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई - राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योगपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरू ठेवण्याच्या दृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची व्यवस्था करावी, त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे, अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून करोना स्थितीचा आढावा घेतला.त्यावेळी ते बोलत होते.करोनाच्या दोन लाटेमधील हा काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा आहे. उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरु राहण्यासाठी कामगारांचे येणे जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घर इथपर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे आहे.
अजून करोनाची दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतू याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरू करतांना सावधगिरीची पाऊले म्हणून लागू केलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कुठेही गर्दी होणार नाही, सभा समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ऑक्सीजनच्या तयारीचाही आढावा घेतला त्यांनी ऑक्सीजन निर्मिती, ऑक्सीजन साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी यासर्वच प्रक्रियेतील वेग देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जनजागृती करा
आशा- अंगणवाडीसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावात जनजागृती करून कराना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले सर्वजण दुसरा डोस वेळेत घेतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे अशी सूचना मुख्यमंत्र्यानी केली. लसीचे दोन्ही डोस घेऊन करोना बाधित होणाऱ्यांची संख्या, त्याची स्थिती आणि कारणे याचे टास्कफोर्सने विश्लेषण करावे, असेही ते म्हणाले.
पारनेर तालुक्यात जिनोम सिक्वेन्सी
पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांनंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर तुलनेने कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हा दर आणखी कमी करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करून संस्थात्मक उपचाराला गती, लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकिय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घेण्याचे निर्देशही आरोग्य विभागाला दिले.